*    तीन दिवसांपासून संततधार पाऊस
*   अप्पर वर्धाचे सर्व दरवाजे उघडले
*    वर्धा नदी धोक्याच्या पातळीवर
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर अमरावती जिल्हय़ात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने रिपरिप सुरू केली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्हय़ात ४६ मि.मी. पावसाची नोंद झाली. चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक १५१ मि.मी. पाऊस बरसला. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती उद्भवली आहे. अप्पर वर्धा धरणाचे सर्व १३ दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
गेले काही दिवस उघाड असल्याने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू केली तोच पावसाने पुन्हा एकदा संततधार सुरू केली. तीन दिवसांपासून सूर्यदर्शन घडलेले नाही. गुरुवारी सायंकाळपासून तर पावसाचा जोर जास्तच वाढला. या पावसामुळे जिल्हय़ातील सर्व नद्यांना पूर आला आहे. मेळघाटातही पूरस्थिती आहे. चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. चोवीस तासांत चिखलदरा तालुक्यात १५० मि.मी., तर धारणी तालुक्यात ६३ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली. अप्पर वर्धा धरणातून सध्या २ हजार ४८४ घनमीटर प्रति सेकंद पाणी सोडण्यात येत आहे. धरणाचे सर्व १३ दरवाजे १.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे लोअर वर्धा धरणातील पाण्याची पातळीही वाढली असून गुरुवारी सकाळी पुरामुळे आष्टी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अप्पर वर्धा धरणात सध्या ५२२ दलघमी (९३ टक्के) जलसाठा झाला आहे. जलाशय पातळी ३९८.७८ मीटपर्यंत पोहोचल्याने सर्व दरवाजे उघडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाला घ्यावा लागला. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ४७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
या पावसाचा सर्वाधिक फटका मुगाच्या पिकाला बसण्याची शक्यता निर्माण झाली असून सोयाबीन आणि कपाशीच्या पिकाचेही नुकसान होऊ लागले आहे. शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्हय़ातील सर्व मध्यम प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. शहानूर प्रकल्प ८८.७१ टक्के भरला असून या धरणाच्या २ दरवाजांमधून प्रति सेकंद १८.८६ घनमीटर पाणी सोडण्यात येत आहे. ८९.५५ टक्के भरलेल्या चंद्रभागा प्रकल्पाच्या तीन दरवाजांमधून ४८.१७ घनमीटर प्रति सेकंद विसर्ग आहे. पूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडे करण्यात आले असून २१५.६८ क्यूसेकचा विसर्ग आहे. या धरणात ८८.८० टक्के पाणीसाठा आहेस तर सापन प्रकल्पातून ४ दरवाजांमधून ६०.१४ क्यूसेक पाणी सोडले जात आहे. या धरणाचा जलसाठा ८६.२४ टक्क्यांवर पोहोचला होता. गेल्या २३ दिवसांमध्ये पावसाने सप्टेंबरचीही पावसाची ओलांडली असून आतापर्यंत १०४ टक्केपावसाची नोंद करण्यात आली आहे. सरासरी ओलांडणाऱ्या तालुक्यांमध्ये धारणी, चिखलदरा, मोर्शी, वरूड, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी आणि चांदूर बाजार तालुक्यांचा समावेश आहे. हे सर्व तालुके सातपुडा पर्वतरांगा आणि त्याच्या पायथ्याशी आहेत. गेल्या चोवीस तासांतील पाऊस- धारणी ६३ मि.मी., चिखलदरा १५१, अमरावती ३२, भातकुली २८, नांदगाव खंडेश्वर १५, चांदूर रेल्वे १२, तिवसा १७, मोर्शी ४६, वरूड ६८, दर्यापूर ४३, अंजनगाव सुर्जी ६२, चांदूर बाजार ५३ आणि धामणगाव रेल्वे ११ मि.मी.