टेस्टिक्युलर टोरेशानसारख्या असाध्य आजारावर वाशी येथील फॉर्टिज रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. पियूष जैन आणि डॉ. ए. के. सिंघल यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून सानपाडा येथील चौधरी दाम्पत्याच्या एका महिन्याच्या मुलाला पुनर्जन्म मिळवून दिला. ही शस्त्रक्रिया एक वेगळी आणि किचकट मानली जाते. मात्र फॉर्टिज रुग्णालयाच्या डॉक्टर पथकाने मोठय़ा शिताफीने ही शस्त्रक्रिया केली. त्यामुळे सुवर्णा चौधरी यांच्या चेहऱ्यावरील बाळाचे हसू कायम राहिले.
सानपाडा येथे राहणाऱ्या सुवर्णा चौधरी यांनी २० नोव्हेंबर रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला.  एक महिन्यात या बाळाची प्रकृती अचानक खालावू लागली. त्याला उलटय़ा, जुलाब, वेदना सुरू झाल्या. त्यामुळे चौधरी दाम्पत्य चिंताग्रस्त झाले. त्यांनी ज्या बाळाला वाशी येथील फॉर्टिज रुग्णालयात दाखल केले, याच रुग्णालयात या बाळाचा जन्म झाला असल्याने डॉक्टरांना या बाळाची मेडिकल हिस्ट्री माहीत होती. त्यांनी या बाळाच्या तपासण्या करून घेतल्या. त्यावेळी त्याला टेस्टिक्युलर टोरेशान म्हणजेच वीर्यात्पादक ग्रंथी स्वत:भोवती गुंडाळल्या गेल्या असल्याचे लक्षात आले. डॉक्टर सिंघल यांनी सर्वप्रथम या बाळाची ऑथरेपक्सी केली. त्यामुळे या बाळाची गुंडाळलेली ग्रंथी सरळ होऊ शकली. ही ग्रंथी पुन्हा गुंडाळली जाऊ नये यासाठी डॉक्टरांनी काळजी घेतली. या ग्रंथीच्या उलट बाजूस असणारी दुसरी ग्रंथीदेखील डॉक्टरांनी सरळ केली. त्यामुळे बाळाचा त्रास कमी झाला. शस्त्रक्रिया केल्यानंतर काही तासांनी डॉक्टरांनी बाळाला दूध पाजण्याची परवानगी दिली. त्याला २४ तास देखरेखीखाली ठेवण्यात आले. आता बाळाची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. जैन आणि डॉ. सिंघल यांनी सांगितले.