* दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजन

हस्तशिल्पकार आणि आदिवासी लोक कलावंतांच्या कलेच्या प्रचार व प्रसारासाठी दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त शनिवारपासून ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा व लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रातील मुक्तांगणमध्ये आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन १ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. महोत्सवात २५० लोकनृत्य कलावंत आणि जवळपास १५० हस्तशिल्पकार भारताच्या विविध राज्यांमधून सहभागी होणार आहेत. ११ डिसेंबपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात नृत्य व हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना बघता येणार आहे. १ ते ६ डिसेंबर कुद नृत्य (जम्मू-काश्मीर), पोतराज, वासुदेव, सोंगी भारूड नृत्य, कठपुतली, बिसू कमसाले, संगराई गोम नृत्य, मरुनी नृत्य, बरदोई सिखला नृत्य, गरुड पर्व नृत्य, अॅनिमल मास्क नृत्य, ७ ते ११ डिसेंबपर्यंत कर्मा नृत्य, बाऊल नृत्य, ओलिअट्टम नृत्य, वेलाकली नृत्य, घोडेमोडनी नृत्य, घांटू नृत्य, रोईना नृत्य, लाई हरोबा नृत्य आणि नटकर्तब सादर करण्यात येईल. गेल्या २० वर्षांपासून सातत्याने या महोत्सवाचे आयोजन केंद्राच्यावतीने करण्यात येते. तालवाद्यांवर सांकेतिक भाषेव्दारे ओळखणे हा लोककला प्रकार प्रथमच या कार्यक्रमांमध्ये सादर केला जाणार असल्याचे दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, सिक्कीम, त्रिपुरा, कर्नाटक, झारखंड, तामिळनाडू, गोवा, नागालॅण्ड, मणिपूर या ठिकाणच्या लोकसंस्कृतीचे दर्शन या निमित्ताने होणार आहे. या नृत्यांचे सादरीकरण दररोज सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत तर हस्तशिल्प मेळा दररोज दुपारी २ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत होईल.  या मेळ्यामध्ये टेराकोटा, हॅण्डलूम, मेटल, वूड कार्विग, ग्लास वर्क, राजस्थानी व पंजाबी पादत्राणे, उलन शाल, चंदेरी साडी, चिकन एम्ब्रॉयडरी, बांबू वर्क, कारपेट, जरी वर्क, कोसा, ब्रास, ज्वेलरी, डोकरा लाकडाची खेळणी, डेकोरेटिव्ह क्राफ्ट, लेदर, सिरॅमिक, केन, पेंटिंग, बटिक प्रिंट, अॅपेलिक, ज्यूट, खादी, छिपाशिल्प आदी वस्तू विक्रीला असतील. विविध खाद्यान्नांचे स्टॉल्सही असतील. छायाचित्र स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली आहे. विजेत्याला १० हजार रुपयांचे, उपविजेत्याला ७ हजार ५०० रुपये आणि तिसरे स्थान पटकाविणाऱ्याला ५ हजार रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात येतील. या महोत्सवासाठी आमदार निवास  आणि डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या जागेत पे अॅण्ड पार्कची सुविधा आहे.