राज्यात सर्वाधिक २८ साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्हयात ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाती घेतलेले आंदोलन पेटले आहे. शनिवारी माढा तालुक्यातील िपपळनेर येथील विठ्ठलराव िशदे सहकारी साखर कारखान्याची ऊसतोड आणि ऊस वाहतूक स्वाभिमानीच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी बंद पाडली. यंदाच्या उसगळीत हंगामात ऊसदर प्रश्नावर सुरू झालेले हे पहिलेच आंदोलन आहे.
     स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विठ्ठलराव िशदे साखर कारखान्याकडील ऊसतोड बंद पाडली. नंतर ऊस वाहतूकही रोखण्यात आली. टेंभूर्णी येथून निघालेल्या आंदोलक कार्यकर्त्यांच्या जत्थ्याने शिवारामध्ये जाऊन तेथील ऊसतोड थांबविण्याचे आवाहन केले. त्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही प्रतिसाद देऊन ऊसतोड थांबविली. अनेक गावांमध्ये ऊसतोड बंदीचे चित्र पाहावयास मिळाले. आंदोलक कार्यकर्त्यांनी विठ्ठलराव िशदे साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूकही बंद पाडली. दुपारी चारच्या सुमारास कार्यकर्त्यांचा हा जत्था विठ्ठलराव िशदे साखर कारखान्यावर जाऊन धडकला. त्याठिकाणी येणारी ऊस वाहतुकीची वाहने रोखून परत पाठविण्यात आल्याचे संजय पाटील-घाटणेकर यांनी सांगितले.
     या आंदाेलनात शिवाजी पाटील, दत्तात्रेय म्हस्के-पाटील, प्रताप पिसाळ, व्यंकट हेगडकर, मारूती नलावडे, सिध्देश्वर घुगे, महावीर सावळे, अण्णा जाधव, परमेश्वर आतकर, गणेश पवार आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. या आंदोलनामुळे माढा तालुक्यातील उसाच्या पट्टयात अशांतता निर्माण झाली आहे. येत्या 8 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे खासदार राजू शेट्टी यांची ऊस परिषद होणार आहे. तोपर्यंत साखर कारखान्यांनी ऊसाचा पहिला हप्ता जाहीर करावा, अशी मागणी संजय पाटील-घाटणेकर यांनी केली. हे आंदोलन जिल्हयात सर्वत्र सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.