हिंगोली जिल्हा परिषदेच्या लेखा आणि वित्त विभागाच्या परीक्षणासाठी पंचायत राज समितीचा दौरा २८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या समितीचे अध्यक्ष आमदार जयप्रकाश दांडेगावकर हे याच जिल्हय़ातील रहिवासी आहेत. स्वत:च्याच जिल्हय़ात पंचायत राज समितीचा दौरा त्यांनी लावल्याने हिंगोली जिल्हा परिषदेत कोटय़वधी रुपयांच्या अखर्चित रकमांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. हिशेब मांडायचा असल्याने अधिकारी हैराण झाले आहेत.
जि.प.च्या लेखापरीक्षणातील त्रुटी व अनियमिततेबाबत तपासणीचे अधिकार या समितीला असतात. विधिमंडळातील सदस्यांची ही समिती असल्याने समितीची ‘बडदास्त’ ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात नाना पद्धतीचे प्रयोग हाती घेतले जातात. हिंगोली जि.प.तील वेगवेगळय़ा कामांची माहिती पंचायत राज समितीच्या अध्यक्षांनाच असल्याने प्रशासन हादरले आहे. विविध योजनांमधील २१ कोटी रुपयांचा अखर्चित निधींचा हिशेब मांडावा लागणार आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशीदेखील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात येऊन बसत आहे. २००८-२००९ मधील लेखापरीक्षण व २०१०-११ मधील प्रशासन अहवालाचे परीक्षण समिती करणार आहे. जिल्हय़ातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी व योजनांची तपासणीही समिती सदस्य करणार आहेत.
अखर्चित निधीचा तपशील
-अंगणवाडी बांधकाम- ४ कोटी ७९ लाख रुपये
-रस्ते विशेष दुरुस्ती- १ कोटी ७० लाख
-अतिवृष्टी व पूरहानी- ३४ लाख २७ हजार
-तीर्थक्षेत्र विकास- ५० लाख ८१ हजार
यांसह विविध योजनांचे २१ कोटी रुपये शिल्लक.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2014 रोजी प्रकाशित
पंचायत राज समितीचा दौरा ‘स्वजिल्हय़ात’! २१ कोटींच्या जुळवाजुळवीने जि. प. त्रस्त
हिंगोली जिल्हा परिषदेच्या लेखा आणि वित्त विभागाच्या परीक्षणासाठी पंचायत राज समितीचा दौरा २८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या समितीचे अध्यक्ष आमदार जयप्रकाश दांडेगावकर हे याच जिल्हय़ातील रहिवासी आहेत.
First published on: 13-01-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panchayati raj committee tour 21 cr manage hingoli