महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना राबवण्यासाठी गतवर्षी प्रोयगिक तत्त्वावर बार्शी व पंढरपूर या दोन तालुक्यात इ-मस्टर प्रणालीद्वारे मजुरांचे पगार (पेमेंट) करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्य़ातील गावातून इ मस्टर प्रणालीद्वारे या योजनेची कामे व पगार देण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी पंढरपूर येथे सांगितले.
पंढरपूर पंचायत समिती अन तहसील कार्यालयावतीने राबवलेल्या अन् यशस्वी झालेल्या  इ प्रणालीची अंमलबजावणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक चित्रफितीद्वारे दाखवून मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी प्रांत बाबासाहेब बेलदार, तहसीलदार सचिन डोंगरे व इतर अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी गेडाम म्हणाले,की दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी व कामात पारदर्शकता यावी या साठी इ-मस्टर प्रणाली प्रत्येक तालुक्यात राबवण्यात येणार आहे. उजनी धरणातून पंढरपूर, सोलापूरकरांसाठी भीमा नदीत पाणी सोडले आहे. हे पाणी दोन ते तीन महिने पुरेल या करता नियोजन करून गुरसाळे बंधारा, औज  बंधारा, पंढरपूर या सर्वात एका वेळी पाणी साठवण्यात आले आहे. या पाण्याचा पिण्यासाठी वापर असून इतर कारणासाठी वापर करताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असे गेडाम यांनी सांगितले.