माहितीच्या अधिकारान्वये माहिती मागितल्याच्या कारणास्तव भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांस बेदम मारहाण करणाऱ्या अभोणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम चौधरी यांच्यासह कर्मचाऱ्यांना निलंबित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन (न्यास)च्या वतीने जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
कळवण तालुक्यातील अभोणा येथील कार्यकर्ता विजय चव्हाण यांनी स्वत:च्या वर्तणुकीचा दाखला मिळावा यासाठी अभोणा पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला होता.
सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्या अर्जावर कोणताच निर्णय घेतला नाही. अनेक दिवसांनंतरही दाखला न मिळाल्याने चव्हाण हे पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे त्यांनी माहिती अधिकारान्वये अर्ज सादर केला असता निरीक्षक श्रीराम चौधरी, शिपाई खांडवी व देशमुख यांनी संतप्त होऊन विनाकारण माहिती घेतो, सामाजिक कामे बंद कर, भ्रष्टाचाराबाबत काही बोलायचे नाही, असे सुनावत आपणास बेदम मारहाण केली.
पुन्हा अर्ज केला तर बघून घेऊ, अशी धमकीही देण्यात आल्याचे चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे. पोलीस निरीक्षकासह दोघा कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात येऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जन आंदोलनाच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर पां. भा. करंजकर, राजेंद्र नानकर, विकास कवडे, संजय करंजकर, स्वप्निल घिया आदींची स्वाक्षरी आहे.