नागपूर जिल्ह्य़ात अनुदानावर २० ट्रॅक्टरचे वाटप
जिल्ह्य़ात अनुदानावर ट्रॅक्टर वाटप करण्याची गेल्या २००८ पासून रखडलेली योजना अखेर मार्गी लागली आहे. शासनाच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने अनुसूचित समाजाचा विकास करण्याच्या दृष्टीने जिल्ह्य़ात ९० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर वाटप करण्याची योजना सुरू आता करण्यात आली असून जिल्ह्य़ातील २० बचत गटांना ट्रॅक्टरचे नुकतेच वाटप करण्यात आले.  
समाज कल्याण विभागाच्या वतीने शेतक ऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर पॉवर ट्रिलर वाटप करण्याची योजना आहे. परंतु गेल्या पाच वर्षांपासून ही योजना बासनात गुंडाळून ठेवलेली होती. या योजनेंतर्गत एकाही पॉवर ट्रिलरचे वाटप करण्यात आले नाही. २००८ मध्ये जिल्ह्य़ातील १२५ शेतक ऱ्यांनी पॉवर ट्रिलरसाठी समाज कल्याण विभागाकडे अर्ज केले होते. शेतकऱ्यांना पॉवर ट्रिलर मिळावे म्हणून जिल्ह्य़ातील शेतकरी कार्यकर्ते संजय सत्येकार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सतत पाठपुरावा केला. याच अनुषंगाने राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडेही तक्रार करण्यात आली होती. परंतु विभागाच्यावतीने पॉवर ट्रिलरचे वाटप करण्यात आले नाही. पाच वर्षांच्या प्रयत्नांना आता यश आले असून जिल्ह्य़ातील २० बचत गटांना ९० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रोटावेटरचे वाटप करण्यात आले आहे.
पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यांतील बचत गटांना ७ ट्रॅक्टर मिळाले आहेत. अनुदानावरील ट्रॅक्टरची मागणी करणाऱ्या या तीन तालुक्यांतील शेतक ऱ्यांची संख्या पाहता वाटपाचे प्रमाण नगण्यच आहे. पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतक ऱ्यांना ट्रॅक्टरचे अनुदानावर वाटप करावे, प्रत्येक तालुक्यात शंभर ट्रॅक्टरचे वाटप करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मेहदी येथील महेंद्र वाघमारे, टेकाडीचे सुनील बारमाटे, कांद्रीचे डॉ. सुरेंद्र वानखेडे, कन्हानचे रिंकेश चौरे, पवनीचे वासू ढोढरे आणि मौद्या येथील श्रीधर वाघमारे यांचा लाभार्थीमध्ये समावेश आहे. ही योजना मार्गी लागावी यासाठी केलेल्या लढय़ात राजू गुडधे, बबन ढोगे, राजू दुनेवार, किशोर सहारे, ओमप्रकाश महादुले, स्वप्नील श्रावणकर, कैलास वाघमारे यांचे सहकार्य लाभले. २००८ पासून रखडलेली योजना मार्गी लागल्याने शेतक ऱ्यांना दिलासा मिळाला आहे.