लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घराणेशाहीवर आसूड ओढणारे राज ठाकरे यांच्या मनसेचे मार्गक्रमणही वेगाने त्याच दिशेने सुरू झाल्याचे अधोरेखीत होत आहे. जाहीर सभांमधून घराणेशाहीवर टीकास्त्र सोडणाऱ्या राज यांनी आता मात्र मनसेचे आमदार उत्तम ढिकले यांच्या घराण्याकडे एकाचवेळी तीन पदे सोपविल्याने स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काही महिन्यांपूर्वी घराणेशाहीबद्दल बोलणाऱ्या राज यांच्या ‘कथनी व करणी’तील फरक प्रकर्षांने जाणवत असल्याची सल कार्यकर्त्यांना आहे.
महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी अॅड. राहुल ढिकले यांची निवड झाल्यानंतर मनसेतील घराणेशाहीचा विषय ऐरणीवर आला आहे. मनसेचे आमदार उत्तम ढिकले यांचे पुत्र अॅड. राहुल हे महापालिकेत नगरसेवक आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, स्थानिक पातळीवर काही संघटनात्मक बदल करण्यात आले. त्यावेळी मनसेच्या शहराध्यक्षपदी अॅड. राहुल ढिकले यांची निवड करण्यात आली. सद्यस्थितीत अॅड. राहुल ढिकले यांच्याकडे शहराध्यक्षपद आणि आता स्थायी समितीचे सभापतीपद अशी दोन पदे आहेत. या माध्यमातून ढिकले घराण्याकडे पदांची संख्या तीनवर पोहचली असल्याकडे पदाधिकारी लक्ष वेधत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात खुद्द राज यांनी घराणेशाहीबद्दलचा आपला तिटकारा जाहीरपणे व्यक्त केला होता. प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या घराणेशाहीवर हल्ला चढविताना ‘भुजबळ यांना सर्व पदे आपल्याच घरात हवीत. स्वत: आमदार व राज्यात मंत्री, पुतण्या खासदार तर मुलगा आमदार’ असल्याचे राज ठिकठिकाणी सांगत होते. राजकारणातील घराणेशाहीविषयी इतकी स्पष्ट भूमिका मांडणारे राज यांनी आता मात्र स्वपक्षातील ढिकले घराण्यावर पदांची बरसात करताना कोणतीही कसूर सोडली नसल्याची भावना स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
मनसेत स्थानिक पातळीवर वेगवेगळे गट पडले आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी पक्षातील नगरसेवक वा आमदार यांना सक्रिय करण्यासाठी राज यांना आपली बरीच शक्ती खर्च करावी लागली. मात्र, त्याचाही लाभ झाला नाही. अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की मनसेवर ओढावली. या निकालानंतर पक्षातील दुसऱ्या गटाने उचल खाल्ली. नाशिकला कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून नावारुपास आणणाऱ्या स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांना बाजूला सारले गेले. महापालिकेतील कामांना गतिमान करण्यासाठी मुंबईहून खास दूत नियुक्त करण्यात आला. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत दुसऱ्या गटाने भाजपला शह कसा देता येईल, हे मनसे अध्यक्षांना पटवून देण्यात यश मिळविले. मनसेने ही निवडणूक न लढता हे पद भाजपला द्यावे, असे दुसऱ्या गटाचे म्हणणे होते. परंतु, त्यांना कोणी विचारातही घेतले नाही. स्थायी सभापतीपद काबीज करण्यात मनसे यशस्वी झाली असली तरी या निवडणुकीने मित्रपक्ष भाजपचा विश्वास गमावल्याचा सूर उमटत आहे. एखाद्याचा विश्वास कमविण्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. पण, तो गमाविण्यासाठी एक क्षणही पुरेसा ठरतो. तो क्षण या निवडणुकीने साधला गेल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jul 2014 रोजी प्रकाशित
मनसेतही घराणेशाहीचा बोलबाला
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घराणेशाहीवर आसूड ओढणारे राज ठाकरे यांच्या मनसेचे मार्गक्रमणही वेगाने त्याच दिशेने सुरू झाल्याचे अधोरेखीत होत आहे.

First published on: 02-07-2014 at 09:44 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political family situation in mns