अतिवृष्टीग्रस्ताना मदत मिळवून देण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांमध्ये चढाओढ लागली असून सरकारकडे निवेदने पाठविण्यासाठी स्थानिक मंत्री आणि नेतेमंडळींपासून अनेक संघटना सक्रिय झाल्या आहेत.
नागपूर जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यांमध्ये यंदा अतिवृष्टीने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त सर्वच शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार नागपुरात आले असताना अनिल देशमुख यांनी त्यांची भेट घेतली. नागपूर जिल्ह्य़ात यंदा अतिवृष्टीमुळे  शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. शेतातील पिके नष्ट होऊन शेत जमीन खरडून निघाली. माती वाहून गेल्याने जमिनीखालील दगड वर आले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांना करण्यात आली.
अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव खासदार मुकुल वासनिक यांनी भिवापूर तालुक्याच्या दौऱ्याप्रसंगी नागरिकांना दिली. खासदार मुकुल वासनिक यांनी उमरेड शहर मांगरूड, बेसूर, नांद, भगवानपूर, जवळी, नक्षी, भिवापूर, कारगाव, शिवापूर या गावातील जनसंपर्क दौरा करून सांस्कृतिक भवन, आयुर्वेदिक दवाखाना, सिमेंट रस्ते व इतर कामाचे लोकार्पण व भूमिपूजन केले. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काँग्रेसने शेतकऱ्यांचे ७२ कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. शेतकऱ्यांना पक्षाने नेहमीच मदतीचा हात दिला आहे, असे यावेळी वासनिक म्हणाले. सर्वसामान्य जनतेला दोन वेळचे पुरेसे अन्न मिळावे म्हणून अन्न सुरक्षा कायदा करण्यात आला. या कायद्यामुळे ८२ कोटी लोकांना या योजनेचा फायदा मिळणार असून सर्वसामान्य नागरिकांना १ रुपया किलो दराने कडधान्य, २ रुपये किलो दराने गहू, ३ रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या आजाराच्या दृष्टीने राजीव गांधी जीवनदायी योजना राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणार असून ९७२ प्रकारच्या आजारांवर या योजनेचा फायदा मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी केंद्रीय ओबीसी आयोगाचे सदस्य दीपक काटोले, नाना गावंडे, दिलीप गुप्ता सुरेश बोराडे, डी.डी. सोनटक्के, पंचायत समिती सभापती कुंदा कंगाले, जिल्हा परिषद सदस्य नंदा नारनवरे, पद्माकर कडू, दीपाली इंगोले, उमरेड नगर परिषद उपाध्यक्ष गंगाधर येवतकर, सोपान दडवे, सुरेश रोकडे, नरेश उरकुडे, बाळू इंगोले रवींद्र चौधरी, अरुण हटवार, पुष्पा बोरकर, दशरथ भोंगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
धरणातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडल्याने गेल्या आठ दिवसांपासून वर्धा, पैनगंगा, वैनगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करूनही पिकांची स्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्य़ात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत रोख स्वरूपात देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केली आहे.
अतिपावसामुळे २०१२-१३ च्या हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. अशातच शेतकऱ्यांनी कर्ज काढून २०१३-१४ च्या शेती हंगामाला सुरुवात केली. मृग नक्षत्रापासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीनची दुबार-तिबार पेरणी करावी लागली. धान उत्पादक शेतकऱ्यांना पऱ्हे टाकू दिले नाही. संततधार पावसामुळे व इरई, निम्न वर्धा, इसापूर, गोसेखुर्दसह इतर धरणातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडल्यााने नदी-नाल्यांना आलेल्या पुरात पिकांचे नुकसान झाले. कर्ज काढून उभारलेले पैसे दुबार-तिबार पेरणीतच खर्च झाल्याने व पुढील शेती हंगामासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. नुकसानग्रस्त पिकांचे सव्‍‌र्हेक्षण करताना जे शेतकरी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून पिके घेत आहेत त्या पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे, मात्र त्यांच्या नोंदी रेकॉर्डला नसल्याने नुकसान यादीत समावेश केला जात नाही. शेतकऱ्यांना मदत वस्तू स्वरूपात न देता रोखीने देण्यात यावी, असे निमकर यांनी म्हटले असून निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.