मुंबईकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे उपस्थित करूनही त्याला उत्तरे मिळत नसल्याची खंत सत्ताधारी शिवसेनेकडूनच व्यक्त करण्यात आली. महापालिकेत २२ वर्षे सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला. तर भाजप नगरसेवक सभागृहाबाहेर शिवसेनेची खिल्ली उडविण्यात व्यस्त होते.
पालिकेच्या प्रभाग समित्या, विशेष समित्या, वैधानिक समित्या आणि सभागृहामध्ये विविध नागरी प्रश्नांना हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे वाचा फोडण्यात येते. तथ्य असलेले हरकतीचे मुद्दे उत्तरासाठी प्रशासनाकडे पाठविले जातात. मात्र या हरकतीच्या मुद्दय़ांची उत्तरे सादर करण्यास प्रशासनाकडून प्रचंड विलंब होता.
अनेक वेळा नगरसेवकाचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर उत्तरे मिळतात. नगरसेवकच तेथे नसेल तर त्या उत्तराचे काय उपयोग, असा हरकतीचा मुद्दा उपस्थित करून शिवसेना नगरसेवक आणि सेंट झेविअर्स महाविद्यालयातील प्राध्यापक अवकाश जाधव यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले.
हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ठरावीक कालावधीत प्रशासनाने त्याचे उत्तर द्यायला हवे. पण उत्तर देण्यास विलंब करून प्रशासन नगरसेवकांच्या अधिकारावरच गदा आणते.
सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी एकमताने यावर ठोस तोडगा सुचवावा आणि प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी अवकाश जाधव यांनी केली. तसेच शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
शिवसेना पालिकेमध्ये २२ वर्षे सत्ता उपभोगत आहे. पण आज हरकतीच्या मुद्दय़ांच्या उत्तरांची आठवण शिवसेनेला झाली का, असा सवाल करीत काँग्रेस नगरसेविका अन्सारी यांनी शिवसेनेवर आरोपांच्या फैरी झाडल्या. काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनीही शिवसेनेवर तोंडसुख घेतले.
हा हरकतीचा मुद्दा होऊ शकत नाही, ही सूचना होऊ शकेल, असा शेरा मारून भाजप नगरसेवक मित्रपक्ष शिवसेनेच्या या मुद्दय़ाची सभागृहाबाहेर खिल्ली उडवीत होते. हरकतीच्या मुद्दय़ावर उत्तरे देण्यासाठी कालमर्यादा असते.
ती प्रशासनाने पाळावी आणि त्यावरील अभिप्राय वेळीस सादर करावे, असे आदेश महापौर स्नेहल आंबेकर यांनी प्रशासनाला दिले.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2015 रोजी प्रकाशित
उत्तरे मिळत नसलेल्या हरकतीच्या मुद्दय़ांवरून राजकारण
मुंबईकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे उपस्थित करूनही त्याला उत्तरे मिळत नसल्याची खंत सत्ताधारी शिवसेनेकडूनच व्यक्त करण्यात आली.

First published on: 07-05-2015 at 06:58 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics in mumbai bmc