डोंबिवलीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमधील गेल्या चाळीस दिवसांपासून बंद असलेल्या वीस कापड उद्योगांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे प्रदूषण आढळून आले नाही. त्यामुळे या कंपन्या पुन्हा सुरू करण्यात येत आहेत, असा अहवाल मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अशोक जाधव यांनी प्रादेशिक अधिकारी भगवानदास सोळंके यांना सादर केला आहे.
गेले चाळीस दिवस ज्या कंपन्या मंडळाने प्रदूषणाच्या नावाखाली बंद ठेवल्या, त्या कंपन्यांमध्ये आता अचानक प्रदूषण नसल्याचा साक्षात्कार प्रदूषण नियंत्रण मंडळाला कसा झाला, असा प्रश्न उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे. बंद कालावधीत कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याची नुकसानभरपाई प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार आहे का, असे प्रश्न उद्योजकांकडून उपस्थित केले जात आहेत.
उल्हास नदी परिसर, डोंबिवली परिसरातील प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित लवादापुढे वनशक्तीने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सुरू आहे. लवादाने प्रदूषणाची गंभीर दखल घेतल्याने बिथरलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी डोंबिवली परिसरातील चाळीस कापड, रासायनिक उद्योग बंद केले आहेत. यामधील २० कापड उद्योग सुरू करण्यास मंडळाने काही दिवसांपूर्वी परवानगी दिली. या परवानगीवरून लवादाने पुन्हा मंडळाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन या कंपन्या सुरू करण्यास तुम्ही लवादाची परवानगी घेतली का, कोणाला विचारून या कंपन्या सुरू केल्या आहेत, असे प्रश्न करून मंडळाविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याचे सूचित केले आहे.
दरम्यान, अन्य उद्योजकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, असे सांगण्यात येते.