ठाणे महापालिकेतील बोगस डॉक्टर भरती प्रकरणामुळे अडचणीत आलेले मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे यांच्याकडून कळवा रुग्णालय तसेच राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचा पदभार आयुक्त आर. ए. राजीव यांनी गुरुवारी काढून घेतला. हा पदभार रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ.  सी. मैत्रा यांच्याकडे तात्पुरता सोपविण्यात आला असून त्यांना अतिरीक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांच्या अधिपत्याखाली काम करण्याच्या सुचना आयुक्त राजीव यांनी दिल्या आहेत.
ठाणे महापालिकेने मोहम्मद झुबेर कुरेशी या बोगस डॉक्टरला सेवेत रुजू करून घेतले होते. त्यासाठी त्याने महापालिकेत बोगस कागदपत्रे सादर केली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर महापालिकेने त्याची सेवा संपुष्टात आणली तसेच महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात नौपाडा ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, आयुक्त राजीव यांनी अतिरिक्त आयुक्तांना या सर्व प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते. तसेच कुरेशीची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करणाऱ्या नियुक्ती समितीतील सर्व सदस्यांना कारणे दाखवा नोटिस बजावली होती. त्याचप्रमाणे संबंधिताना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या बोगस डॉक्टर भरती प्रकरणामुळे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे काहीसे अडचणीत आले आहेत. दरम्यान, आयुक्त राजीव यांनी गुरुवारी त्यांच्याकडून कळवा रुग्णालय तसेच राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचा पदभार काढून घेतला व हा पदभार डॉ. सी. मैत्रा यांच्याकडे तात्पुरता सोपविला आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांच्या अधिपत्याखाली काम करण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. या वृत्ताला आयुक्त राजीव यांनी दुजोरा दिला असून प्रशासकीय कारणास्तव पदभार काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच डॉ. केंद्रे यांची सुट्टी नामंजूर केली असतानाही ते सुट्टीवर गेले आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.