आर्णीजवळच जवळा येथे १३२ के.व्ही.उपकेंद्राच्या निर्माण कार्याचे भूमिपूजन रविवारी, २ फेब्रुवारीला ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते झाले.
या भागातील नेहमी विजेची टंचाई लक्षात घेता १३२ के.व्ही. उपकेंद्राची मागणी बऱ्याच वर्षांपासून होती. त्याची दखल घेऊन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी ऊर्जा मंत्रालयाकडे पाठपुरावा करून व त्या दृष्टीने मुंबईला एक बठक सुध्दा आयोजित केली होती. तेव्हाच त्या उपकेंद्राला हिरवी झेंडी मिळाली. मंजूर झालेल्या या १३२ के.व्ही.उपकेंद्राचे आता रितसर भूुमपूजन झालेले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव मोघे प्रामुख्याने उपस्थित होते. विजेच्या बिलाचा योग्य वेळी भरणा केल्यास, तसेच वीज चोरीवर नियंत्रण मिळाल्यास भारनियमनाचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल. विजेची चोरी व विजेच्या बिलाचा भरणा मोठय़ा प्रमाणात असून त्यात सुधारणा होण्याचे आवश्यक असल्याचे विचार ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी याप्रसंगी व्यक्त केले. मोघे यांनी राज्य शासन विकास कार्यात आघाडीवर असून ग्रामीण भागाचा विकास व्हावा व उद्योग निर्मिती व्हावी, या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाला आर्णी पंचायत समितीचे सभापती राजू विरखेडे, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष साजीद बेग, डॉ.रामचरण चव्हाण, विलास पाटील, भारत राठोड, आर्णीचे नगराध्यक्ष अनिल आडे, वीज वितरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून असलेल्या भाजपचे खासदास हंसराज अहीर, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, कॉंग्रेसचे खासदार विजय दर्डा, राष्ट्रवादीचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहर नाईक, आमदार संदीप बाजोरिया यांनी मात्र कार्यक्रमाला दांडी मारल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, राजेंद्र मुळक यांना शिवसेनेच्या वतीने घेराव घालून आर्णी तालुक्यातील लोणी, येरमल, लोणबेहळ व सावळी येथील शेतकऱ्यांच्या वीज समस्या संदर्भात एक निवेदन सादर केले. जिल्हा शिवसेना उपप्रमुख प्रवीण िशदे व तालुका शिवसेना प्रमुख रवी राठोड यांच्या नेतृत्वाखाली समस्या मांडण्यात आल्या. तेव्हा  मुळक यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
३३ के.व्ही.उपकेंद्रातून केवळ २० के.व्ही. एवढीच वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले.