महाराष्ट्र शासनाने एक महिन्यापूर्वी नव्याने जारी केलेल्या स्थानिक संस्था कराविरोधात भारतीय जनता पक्षाने पुकारलेल्या बंदला नागपुरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. किरकोळ दुकानांचा अपवाद वगळला आज नागपुरातील सर्व बाजारपेठा बंद होत्या. सिव्हील लाईन्स, सेमिनरी हिल्ससह अनेक भागात बुधवारी दुपारी संचारबंदीसारखे वातावरण होते. दरम्यान, आता बेमुदत बंद पाळला जाणार असल्याचे नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने जाहीर केले आहे.
स्थानिक संस्था कर जाहीर होताच एप्रिल महिन्यापासूनच व्यापाऱ्यांचा विरोध सुरू आहे. गेल्या दहा दिवसांपासून नागपुरात व्यापाऱ्यांचा बंद सुरूच आहे. पेट्रोल पंप चालकांनी दोन दिवस बंद पाळून या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. हॉटेल व्यावसायिकांनीही बंद पाळला. त्यातच आज भारतीय जनता पक्षाने बंद पुकारला. काल सायंकाळनंतर शहरात पाच ठिकाणी बसेसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे बुधवारी बंद दरम्यान हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावला होता. कालपासून पोलीस बसेसवर दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत होते.
आज सकाळी शहरातील काही भागात पानठेले, हातगाडीवरील फिरत्या विक्रेत्यांसह काही दुकाने उघडली होती. सकाळी दहा वाजताच्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांची वर्धमान नगरातून मिरवणूक निघाली. राजेश बागडी, प्रभाकर येवले, संदीप जोशी, सुधाकर कोहळे, संजय बंगाले. विवेक तरासे, प्रवीण दटके, अविनाश ठाकरे, चेतना टांक, बंटी कुकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी मिरवणुकीत सहभागी झाले होते. ही मिरवणूक शहराच्या विविध भागात फिरली. शहराच्या प्रत्येक भागात महिला, पुरुष व तरुण कार्यकर्त्यांचे गट बंदचे आवाहन करीत फिरला. दुचाकींवरही तरुणांचे गट शहरात फिरून बंदचे आवाहन करीत होते. औषधे दुकानांना बंदमधून वगळण्यात आले होते.
इतवारी, सराफा बाजार, किराणा ओळ, लोखंड ओळ, कापड बाजार, गांधीबाग, महाल, केळीबाग रोड, सेंट्रल अॅव्हेन्यू, सक्करदरा, सिरसपेठ, अयोध्यानगर, तुकडोजी पुतळा, रामेश्वरी, मानेवाडा, मेडिकल चौक, सुभाष रोड, धंतोली, धरमपेठ, गोकुळपेठ, वर्धमाननगर, सतरंजीपुरा, शांतीनगर, भंडारा रोड, सिव्हिल लाईन्स, सीताबर्डी, गिट्टीखदान, खामला, रिंग रोड, वाडी, हिंगणा, वर्धा रोड, जयताळा, प्रतापनगर, गोपालनगर, सदर, कामठी रोड, गड्डीगोदाम, कमाल टॉकीज, इंदोरा, जरीपटका, मानकापूर, यशोधरा नगर, कळमना, पारडी, दिघोरी आदी शहराच्या सर्व भागातील बाजारपेठा बंद होत्या. स्थानिक संस्था कराविरोधातच हा बंद असल्याने शहरातील बहुसंख्य व्यापाऱ्यांनी आजही त्यांची दुकाने उघडलीच नाहीत. दुपारी बारा नंतर काही किरकोळ अपवाद वगळता शहरातील सर्वच भागातील दुकाने बंद झाली होती. पेट्रोल पंप सुरू होते.
आज निसर्गही बंदच्या मदतीला धावून आला. सकाळी दहा वाजेपासूनच उन्ह वाढायला सुरुवात झाली होती. साडेअकरा वाजता उन्हाच्या उष्ण झळा लागत होत्या. त्यामुळेही दुकानदारांनी दुकाने बंद करून घरची वाट धरली. महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाची सुटी असल्याने चाकरमाने घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी होती. सिव्हिल लाईन्ससह शहरातील अनेक भागात आज संचारबंदीसारखे दृश्य होते. काल सायंकाळी बसेसवर दगडफेक झाली तरी आज दिवसभर बंद शांततेत पाळण्यात आला. एस.टी. किंवा स्टार बसेसवर शहरात कुठेच दगडफेक झाली नाही. शहर व ग्रामीण भागात बस वाहतूक सुरळीत सुरू होती. वाढचे तापमान व बंद पाहता रस्त्यावर विक्री करणाऱ्या किरकोळ दुकानदारांनीही आज घरीच राहणे पसंत केले. अपवादवगळता अनेक ठिकाणी पानठेलेही बंद होते. सीताबर्डीवरील इलेक्ट्रॉनिक्स दुकानदारांनीही आज कडकडीत बंद पाळून दिवसभर एक दिवसाचे उपोषण केले.
दरम्यान, महापालिका आयुक्त श्याम वर्धने हे स्थानिक संस्था करासंदर्भात भ्रमित करीत असल्याचे उलट आरोप नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने केला आहे. चहा, पानठेले, खाद्य पदार्थ विक्रेते, व्हेंडर्स, डॉक्टर, अभियंते, वास्तुशिल्पकार, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये यांनाही स्थामिक संस्था करासाठी नोंदणी करावी लागणार आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. स्थानिक संस्था कराविरोधात आता राज्यातील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे ‘एनव्हीसीसी’चे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी जाहीर केले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2013 रोजी प्रकाशित
‘बंद’च्या आवाहनाला साद; नागपुरात कडकडीत हरताळ
महाराष्ट्र शासनाने एक महिन्यापूर्वी नव्याने जारी केलेल्या स्थानिक संस्था कराविरोधात भारतीय जनता पक्षाने पुकारलेल्या बंदला नागपुरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. किरकोळ दुकानांचा अपवाद वगळला आज नागपुरातील सर्व बाजारपेठा बंद होत्या.
First published on: 02-05-2013 at 04:04 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Powerful closed in nagpur against lbt