मतदानाची अपेक्षित समीकरणे बिघडली
सासवड येथील ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विदर्भातील ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर यांचा अनपेक्षित पराभव विदर्भ साहित्य संघ आणि त्यांच्या चाहत्या वर्गाला आश्चर्याचा धक्का देणारा ठरला तर फमुंच्या विदर्भातील चाहत्यांमध्ये या निकालाने आनंदाची लाट आली आहे. विदर्भ साहित्य संघात फमुं आणि गणोरकर अशा दोन गटात मित्रमैत्रिणी विभागले होते. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तेव्हा एकमेकांना एका मर्यादेत खिजवण्याचे प्रकारही घडले.
विदर्भ साहित्य संघ ज्या उमेदवाराच्या पाठिशी असतो, तो उमेदवार हमखास जिंकतो अशी जी काही समीकरणे तथाकथित लोकांनी पाडून ठेवली आहेत त्याला डॉ. द.भि. कुलकर्णी यांच्यानंतर ही निवडणूक देखील अपवाद ठरली. विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थेतील अनेक मतदार डॉ. गणोरकर यांचे समर्थक होते. एक महिला म्हणून यावेळी गणोरकरांचे पारडे जड राहील, असा त्यांच्या चाहत्यांना जबरदस्त विश्वास होता. त्यासाठी गेल्यावर्षी महिला साहित्यिकांच्या क्षमतेविषयी आणि संमेलनाचे अध्यक्ष म्हणून केवळ चारच महिला झाल्याची केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रतिक्रिया गणोरकरांच्या अपेक्षा वाढविणारी होती. त्यामुळे अनेकदा त्यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. नागपूर, मुंबई आणि पुण्यातून डॉ. गणोरकरांनी अध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज लक्षात घेता त्यातील सुचक आणि अनुमोदकांमध्ये त्या त्या घटक संस्थांतील स्त्रियांची संख्या डोळ्यात भरणारी होती. शिवाय एवढय़ा वर्षांनंतर महिला अध्यक्ष म्हणून मतदारांची सहानुभूती गणोरकरांनाच मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना होता. आजच्या निकालानंतर जातीपातीचे, गटातटाचे राजकारण झाले. शेवटच्यावेळी जातीची समीकरणे बिघडली, असे त्यांचे समर्थक म्हणू लागले आहेत. बृहन्महाराष्ट्रात एकटी बाई कुठेकुठे फिरणार? तिच्या व्यक्तिगत मर्यादा आहेत, अशी सहानुभूतीही बाईंना मिळत आहे.
क्षमतेऐवजी जातीपातीचे राजकारण प्रभावी ठरले असते तर गणोरकरांच्या निवडीची शक्यताच जास्त होती. कारण, ब्राह्मण मतदारच मोठय़ा संख्येने आहेत, असे स्पष्ट मत फमुंच्या गोटातून व्यक्त करण्यात आले आहे. उलट बाईंना चार भिंतीत वाचन, लेखन करून गंभीर राहणेच जास्त पसंत असल्याने त्या माणसात जास्त मिसळत नाहीत, हे देखील मतदार जाणून होते. त्यातुलनेत माणूस म्हणून फमुंच्या साहित्याबरोबरच त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे. महत्त्वाचे म्हणजे यजमान संस्थेकडे थोडेथिटके नसून तब्बल ८० मतदार असतात. अध्यक्ष होणाऱ्या व्यक्तीने संमेलन गाजवून सोडावे, तेथील मातीशी नाळ जोडावी, वक्तृत्वाने सर्वाना खिळवून-भारावून सोडून एक ऐतिहासिक घटना म्हणून संस्थेचा नावलौकिक व्हावा, अशी माफक अपेक्षा संमेलन आयोजनकर्त्यांची असते. याबाबतीत यजमान संस्थेला फ.मुं. जवळचे वाटणे, यात नवल नसल्याने अनेकांचे मत पडले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Oct 2013 रोजी प्रकाशित
प्रभा गणोरकरांच्या समर्थकांना पराभवाचा धक्का
मतदानाची अपेक्षित समीकरणे बिघडली सासवड येथील ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विदर्भातील ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर यांचा अनपेक्षित पराभव विदर्भ साहित्य संघ आणि त्यांच्या

First published on: 17-10-2013 at 08:23 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabha gnokars supporters face the loss