भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानला स्वत:चे राहते घर दान करून येथील प्रभाकर नळदुर्गकर यांनी समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला. या दातृत्वाबद्दल नळदुर्गकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर, सि. ना. आलुरे गुरुजी, रोटरीचे माजी प्रांतपाल रवींद्र साळुंके, अध्यक्ष रमेश सारडा, भटके विमुक्त विकास परिषदेचे भाऊ पवार, उमाकांत मिटकर, रावसाहेब कुलकर्णी, डॉ. अभय शहापूरकर, शेषाद्री डांगे आदींची या वेळी उपस्थिती होती. नळदुर्गकर यांनी सांगितले, की वडील तथा उस्मानाबादचे पहिले खासदार दिवंगत व्यंकटराव नळदुर्गकर यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे हा उपक्रम राबविला. खासदार म्हणून काम करताना, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील दिवंगत भाई उद्धवराव पाटील यांना वडिलांनी मोठी मदत केली होती. आपण माणसे सांभाळली, परंतु सामाजिक काम करता आले नाही. त्यामुळेच वडिलांच्या नावे ट्रस्ट काढून या माध्यमातून समाजातील वंचित, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करीत आहोत. भटक्या विमुक्त विकास प्रतिष्ठान यासारख्या उपेक्षितांसाठी काम करणाऱ्या संस्थेला राहते घर दान करण्यात येत असल्याने आपणास अतीव आनंद होत असल्याचेही ते म्हणाले.
रोटरीचे अध्यक्ष रमेश सारडा यांनी सांगितले, की एकीकडे ओरबाडण्यासारखी स्पर्धा सुरू असतानाच दुसरीकडे नळदुर्गकर यांनी मात्र आपले राहते घर दान करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. रोटरीच्या नेत्र रुग्णालय उभारणीतही त्यांचे मोठे योगदान लाभले आहे. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या वतीने भाऊ पवार, उमाकांत मिटकरी, रावसाहेब कुलकर्णी, डॉ. अभय शहापूरकर यांनी नळदुर्गकर काकांचा सत्कार केला. शेषाद्री डांगे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.