बुलढाणा व मोताळा तालुक्यातील वन व खाजगी क्षेत्रातील चंदन तस्करीला उधाण आले आहे. खुलेआम होत असलेल्या चंदन तस्करीला प्रतिबंध घालण्यात दोन्ही परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी व अधिनस्त वन कर्मचारी सपशेल अपयशी ठरले आहे.
बुलढाणा तालुक्यातील पाडळी, गिरडा, जनुनासह मोताळा तालुक्यातील धामणगावव बढे, किन्होळा, पान्हेरा, गोतमारा व कुऱ्हा तसेच नजीकच्या खांदेश परिसरात   पळसखेड, कापूसवाडी व राजनी शिवारात चंदन तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या तस्करांनी हजाराहून अधिक मौल्यवान चंदनाच्या लाखो रूपयांच्या झाडांची अवैध कत्तल करून त्यांची चोरटया मार्गाने विल्हेवाट लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान ५ मार्च रोजी पान्हेरा येथे चंदनाच्या झाडांची पाहणी करणाऱ्या दोन चंदन चोरटयांचा पाठलाग करून ग्रामस्थांनी त्यांना पकडले व पोलिसांच्या हवाली केले, तर इतर तीन चंदन तस्कर पळून जाण्यात  यशस्वी ठरले.
जळगाव, खानदेश व बुलढाणा जिल्हयाच्या सिमावर्ती भागात वनक्षेत्रातील व खाजगी जमिनीवर हजारो चंदनाची मौल्यवान वृक्ष आहेत. या वृक्षांवर खांदेश व गुजरात मध्यप्रदेशातील चंदन तस्कराची नजर पडली असून चंदनाची अवैध कत्तल, वाहतूक व तस्करीच्या अनेक टोळया त्यांनी या भागात रवाना केल्या आहेत. आतापर्यंत खाजगी जमिनीवरील एक हजार चंदनाची झाडे लंपास झाली आहे.
वनक्षेत्रातील जमिनीवरील हजारो वृक्ष चंदन तस्करीमुळे नामशेष झाले आहेत. याकडे बुलढाणा व मोताळा वनपरिक्षेत्राचे अधिकारी व अधिनस्त कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. मोताळा वनपरिक्षेत्रात रात्रीची गस्त अजिबात होत नसल्याने चंदन तस्कराचे चांगलेच फावले आहे. या चंदन तस्करीला आळा घालण्यासोबत वनअधिकाऱ्यांची जबाबदारी पक्की करण्याची वेळ आली आहे.