कामे वेळेत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
दीक्षाभूमीवर पार पडणाऱ्या ५७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रत्येक विभागाकडे सोपविण्यात आलेली कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे, महापालिका आयुक्त श्याम वर्धने, पोलीस उपायुक्त एस.एम. वाघमारे, पोलीस अधीक्षक मनोज शर्मा, दीक्षाभूमी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष सदानंद फुलझेले, माजी आमदार सुलेखा कुंभारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश महाजन आदी उपस्थित होते.
देश-विदेशातील विशेषत: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बौद्ध अनुयायी धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येतात. येणाऱ्या भाविकांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. ११ ते १४ ऑक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी लाखोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती असते. त्यासाठी या परिसरातील साफ-सफाईची कामे सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
दीक्षाभूमी बाहेरच्या परिसरात निरनिराळ्या ठिकाणी ६२० शौचालये बांधण्यात येणार असून फिरत्या शौचालयाची सुविधाही करण्यात आली आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता एस.टी. महामंडळाने बाहेरगावाहून बसेस सोडण्यासाठी नियोजन करावे, नागपूर ते ड्रॅगन पॅलेस दरम्यान एस.टी. व ११५ स्टार बसेसची सुविधा देण्यात येणार असून ६२ स्टार बसेस नागपूरच्या विविध ठिकाणावरून धावणार आहेत. या काळात वीज खंडित होणार नाही याची दक्षता स्पॅन्को व एमएसईबीने घेण्याचे मान्य करून फ्लड लाईट व आकस्मिकरित्या वीज खंडित झाल्यास जनरेटरची सुविधी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. येणाऱ्या अनुयायांचे आरोग्य बिघडल्यास त्यांना तातडीने औषधोपचाराची सुविधा देण्यात यावी, तसेच खासगी रुग्णालयात तीन ते चार खाटांची व्यवस्था ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. होर्डिगवर सूचना लिहून येणाऱ्या लोकांना मार्गपथ दाखवण्यात यावे, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, काही संघटना व स्वयंसेवी संस्था भोजनदान करतात, अशा संघटनांनी महापालिका, पोलीस विभाग व स्मारक समितीकडे संस्थेच्या नावाची नोंदणी करावी, दीक्षाभूमीवर नियंत्रण कक्षाची स्थापना करून लोकांना मार्गदर्शन व सूचना द्याव्या, भोजनदान करणाऱ्यांनी अन्न व औषध विभागाची परवानगी घेऊनच भाविकांना भोजनदान करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.