मुस्लिमधर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्याचा पूर्वार्ध संपवून उत्तरार्ध सुरू झाला. सोलापुरातील ऐतिहासिक विजापूर वेशीत मीना बाजार भरविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. रमजान ईदनिमित्त लागणारे पदार्थ, साहित्य, वस्तूंची विक्री या मीना बाजारात होते. यात यंदा सुमारे पाच कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.
विजापूर वेशीत व हैदराबादच्या धर्तीवर मीना बाजार भरविण्याची पूर्वापार परंपरा आहे.  शिरखुर्मा तयार करण्यासाठी लागणारा सुका मेवा, शेवयांपासून क्रॉकरी, सौंदर्य प्रसाधने, कपडे, पादत्राणे, अत्तर, तसेच धार्मिक ग्रंथ इत्यादी साहित्यांची विक्री या मीना बाजारात केली जाते. त्यासाठी परिसरात छोटी छोटी पाचशे ते सातशे दालने थाटली जातात.
मीना बाजाराचे व्यवस्थापन पाहण्यासाठी स्वतंत्र समिती कार्यरत असून या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा अ. अजीज सालार हे सांभाळत आहेत. म. सलीम हिरोली, महमदसाहेब सौदागर, हाजी नजम रंगरेज, रफिक शहापुरे, मतीन बागवान, अख्तर शेख, मल्लिनाथ टिमके, मुनाफ चौधरी, मैनोद्दीन शेख, कामील शोलापुरी, इसाक सय्यद यांचा अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. ईदच्या अगोदर तीन दिवसांपासून मीना बाजारात प्रचंड गर्दी होते. विशेषत: महिलांची गर्दी असते. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी मीना बाजार समिती घेते. तसेच पोलीस प्रशासन, वीज वितरण कंपनी, महानगरपालिका यांचेही मोलाचे सहकार्य लाभते. यंदा शहरात डिजिटल फलकांचे पेव फुटले असून त्यामुळे अधून मधून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान मिळते. त्याचा विचार करून यंदा मीना बाजारात कोणत्याही व्यक्तीचा किंवा संस्थेचा डिजिटल फलक लावण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी सालार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार व पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांना भेटून सादर करण्यात आल्याचे सालार यांनी सांगितले.