संप, निदर्शने, मोर्चा अशा प्रकारच्या आंदोलनांच्या बुरख्याआडून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. हे ध्यानात घेऊन शहरात २७ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून १० जानेवारीपर्यंत १५ दिवसांसाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. देशात कुठेही एखादी जातीय घटना घडल्यास त्याचे पडसाद पोलीस आयुक्तालय क्षेत्रात उमटण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांकडून काही र्निबध टाकण्यात येणार आहेत. औद्योगिक किंवा इतर कोणत्याही सामाजिक कारणावरून पुकारण्यात येणाऱ्या आंदोलनावरूनही कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहोचू शकते. एक्सएलओ इंडिया तसेच इन्फोसेस सी अॅण्ड एम व्ही कंपोनेटस् प्रा. लि. या कंपन्यांमध्ये विविध कारणांस्तव व्यवस्थापन व कामगारांमध्ये वाद सुरू असल्याचे उदाहरणही पोलिसांनी या संदर्भात दिले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राजकीय पक्ष, विविध संघटनांकडून पक्षांच्या बैठका, मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. आपले बळ दाखविण्यासाठी विविध स्वरूपांचे आंदोलन केले जाण्याची शक्यता असते. तसेच वीज दरवाढविरोधात आंदोलनांची मालिका सुरूच आहे. दुसरीकडे मका व कांद्याच्या दरावरून शेतकरी वारंवार रस्त्यावर उतरून वाहतूक रोखून धरीत आहेत. महाविद्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीररीत्या शुल्क घेतले जात असल्याचे कारण देत छात्रभारती संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. हा सर्व संदर्भ प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील निवेदनात पोलिसांनी दिला आहे. पोलिसांच्या दृष्टिकोनातून ३१ डिसेंबरची रात्र अधिक चिंतेची बाब असते. जुन्या वर्षांला निरोप आणि नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रकारही घडत असतात. त्यामुळे अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या सर्व पाश्र्वभूमीवर पोलिसांनी काही र्निबध टाकले आहेत. त्यानुसार पोलिसांच्या परवानगीशिवाय अथवा पोलिसांना न कळविता कोणतेही आंदोलन अथवा मेळाव्यांचे आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास अटकाव करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, अर्वाच्य घोषणा देणे, राज्य किंवा देशविघातक भाषणे करणे, अशा कृत्यांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप दिवाण यांनी दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2013 रोजी प्रकाशित
कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना
संप, निदर्शने, मोर्चा अशा प्रकारच्या आंदोलनांच्या बुरख्याआडून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
First published on: 28-12-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preventive measures from police for maintaining law and order