चांदवड शहरातील दोन प्राध्यापकांनी आपल्या प्रमाणपत्राचा एकाचवेळी नोकरीसाठी तसेच औषध दुकानासाठी ‘फार्मासिस्ट’ म्हणून दुरुपयोग केला आणि एका प्रकरणात औषध पेढीच्या मालकांनी त्यांना मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने अन्न व औषध प्रशासनाने या संशयितांविरुद्ध दोन स्वतंत्र तक्रारी पोलीस ठाण्यात दिल्या आहेत. यावरून औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या प्रा. उर्मिला निलेश डुंगरवाल, गणेश मेडिकलचे संचालक जितेंद्र डुंगरवाल व अमोल ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या कारवाईचा केमिस्ट असोसिएशनने निषेध केला असून अन्न व औषध प्रशासन जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चांदवड शहरात ही कारवाई केली. फकीरचंद लोढा फार्मसी महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या उर्मिला डुंगरवाल तर मालेगाव तालुक्यातील विवेकानंद संस्थेच्या महाविद्यालयात अमोल ठाकरे हा पूर्णवेळ काम करत असल्याचे आढळून आले. असे असताना ठाकरे हा संजस्वा मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्समध्ये तर उर्मिला डुंगरवाल या गणेश मेडिकलमध्ये पूर्णवेळ ‘फार्मासिस्ट’ म्हणून कार्यरत होते. या दोन्ही व्यक्ती एकाचवेळी दोन्ही ठिकाणी पूर्णवेळ काम करणे म्हणजे त्यांनी नोंदणी प्रमाणपत्राचा दुरुपयोग केल्याचे या विभागाने म्हटले आहे. डुंगरवाल यांना दोन्ही ठिकाणी नोकरी करताना पेढीचे मालक जितेंद्र डुंगरवाल यांनी मदत केल्याचे उघड झाले. संबंधितांनी विहित कायद्याचे उल्लंघन केल्यावरून त्यांच्याविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तसेच अमोल ठाकरे विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या कारवाईचा नाशिक केमिस्ट असोसिएशनने निषेध केला. या अनुषंगाने बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष मयुर अलई यांनी माहिती दिली. चांदवड येथील गणेश मेडिकलचे संचालक जितेंद्र डुंगरवाल काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यामुळे त्यांचे दुकान बंद होते. दुकानाच्या बाजुने घरात जाण्याचा रस्ता आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील फलक बंद असतानाही आतील व्यक्तींना दुकान उघडण्यास भाग पाडले. दुकान बंद असल्याने साहजिकच ‘फार्मासिस्ट’ हजर नव्हता. तरी देखील औषध निरीक्षकांनी तपासणी सुरू केली. यावेळी मागितलेली सर्व कागदपत्रे डुंगरवाल उपस्थित नसल्याने ‘फार्मासिस्ट’ देऊ शकला नाही. काहीही झाले तरी कारवाई करायची या तयारीने आलेल्या औषध निरीक्षकांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून औषध व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप अलई यांनी केला. या प्रकारची कारवाई कार्यकारिणी सदस्य व पदाधिकाऱ्यांवर होणार असल्याची चर्चा आहे. नाशिक विभागीय अन्न व औषध प्रशासन जाणीवपुर्वक आपल्या अधिकारांचा गैरवापर करत औषध व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. या दबावतंत्राला कोणी व्यावसायिकांनी बळी पडू नये असे आवाहन संघटनेने केले आहे. सर्व सदस्यांनी शांततेने व निर्भयपणे आपला व्यवसाय करावा, असे आवाहन  सचिव योगेश बागरेचा यांनी केले आहे.