आपला विषय फक्त शिकवण्यापुरता मर्यादीत न ठेवता त्यात अधिकाधिक काम करणारे प्राध्यापक म्हणजे न्यू आर्टस महाविद्यालयाचे वैभव आहे असे उद्गार राज्याचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) अनिल मोहन यांनी काढले.
न्यू आर्टस मधील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक व पक्षीमित्र डॉ. सुधाकर कुऱ्हाडे तसेच पर्यावरणशास्त्र विभागातील प्रा. प्रशांत वाघ यांनी नांदूर मध्यमेश्वरची निसर्गगाथा हा माहितीपट तयार केला. त्याचे प्रकाशन नाशिक येथे अनिल मोहन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. वनसंरक्षक अरविंद विसपुते हेही यावेळी उपस्थित होते.
मोहन यांनी सांगितले की बहुसंख्य प्राध्यापक विषय शिकवतात व जातात, त्या पाश्र्वभुमीवर डॉ. कुऱ्हाडे व वाघ यांचे वेगळेपण लक्षात भरणारे आहे. नांदूर मध्यमेश्वर चे पक्षीअभयारण्य वैशिष्टय़पुर्ण आहे. बरीच जैवविविधता यात आहे. त्याचा अभ्यास करून तयार केलेला हा माहितीपट वनविभागासाठी तसेच या अभयारण्याला भेट देणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारा आहे.
विसपुते यांचेही यावेळी भाषण झाले. न्यु आर्टस् चे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, उपप्राचार्य डॉ. जाधव, संज्ञापन अभ्यास विभागाचे प्रमुख बापू चंदनशिवे, प्रा. राहूल चौधरी यांचे सहकार्य मिळाल्याचे डॉ. कुऱ्हाडे व वाघ यांनी सांगितले. कार्यक्रमाला पक्षीमित्र बाळासाहेब कुलकर्णी, वनविभागाचे अधिकारी सर्वश्री गोलेकर, पाटील, देसले,बरवंटकर, बागूल, खेडकर, महाजन, तसेच छायाचित्रकार अनिल माळी, किरण वाघ, किरण भंडारी, पुष्कर अकोलकर आदी उपस्थित होते.