औरंगाबाद जिल्ह्य़ात दुष्काळाची भयावह स्थिती आहे. गावपातळीवर बैठका घेऊन दुष्काळग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा छावणी व बेरोजगारांना काम न मिळाल्यास भाजपाच्या वतीने व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला.
भाजप शहर कार्यालयात जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जिल्ह्य़ातील सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. जाधव म्हणाले की, जिल्ह्य़ातील भीषण दुष्काळी स्थिती पाहता, दुष्काळग्रस्तांना आजही सरकारकडून मदत मिळाली नाही. मदत मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने पुढाकार घेतला जाणार आहे. प्रत्येक गावास पुरेसे पाणी, जनावरांसाठी चारा छावणी सुरू करावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे आदी मागण्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रत्येक तहसील कार्यालयावर निदर्शने, घेराव या माध्यमातून जनआंदोलन छेडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
हारतुऱ्यांना फाटा
जाधव यांनी जिल्ह्य़ातील दुष्काळी स्थितीत कार्यकर्त्यांकडून कुठल्याही प्रकारचे हारतुरे स्वीकारले नाहीत. तसेच यापुढे सत्कार स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले.