महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्य़ातील अनेक संघटनांनी एकत्र येऊन बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जादूटोणा विरोधी कायदा त्वरित मंजूर करण्यात यावा व आरोपींना तत्काळ अटक व्हावी, अशी शासनाला मागणी करण्यात आली.   
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस प्रा. नरेश आंबिलकर, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे यांनी केले. याप्रसंगी आयोजित विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी बौद्ध साहित्य व सांस्कृतिक कें द्राचे सचिव हर्षल मेश्राम होते.
याप्रसंगी ओ.बी.सी. सेवा संघाचे उपाध्यक्ष  केशव हूड, महिला डी.एड. कॉलेजच्या प्राचार्य विजया पाटील, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष मदन बांडेबुचे, तालुको संघटक प्रा. डी.जी. रंगारी, कीर्ती गणवीर, समता सैनिक दलाचे विदर्भ प्रवक्ता प्रा. बबन मेश्राम, प्रबुद्ध महिला संघटनेच्या प्रियकला मेश्राम, ओ.बी.सी. सेवा संघाचे अध्यक्ष भैयाजी लांबट, जनचेतना मतिमंद विद्यालयाचे संचालक संजय घोळके, भारत स्वाभिमान न्यासाचे अध्यक्ष रामबिलास सारडा, कास्ट्राईब संघटनेचे अमृत बन्सोड, गांधी विचार मंचाचे प्रा. वामन तुरिले, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सागर बागडे, अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी न्यायमंचाचे अध्यक्ष सुरज परदेशी, अंनिस भंडाराचे अध्यक्ष प्रा. एन.आर. राजपूत, एकलव्य सेनेचे अध्यक्ष प्रा. आलोक केवट, अंनिसच्या पदाधिकारी प्रा. डॉ. जयश्री सातोकर, छाया कावळे, बासप्पा फाये, प्रबुद्ध महिला संघटनेच्या प्रा. वासंती सरदार. डॉ. अनिल नितनवरे, साप्ताहिक वृत्तदर्पणचे संपादक जयकृष्ण बावणकर, यांनी श्रद्धांजली अर्पण करून विचार व्यक्त केले.
यानंतर जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या पुढाऱ्यांना  शासनाने संरक्षण पुरवावे, अशी मागणी केली गेली.