कर्मवीर दादासाहेब गायकवाड हेच ओझर येथील एचएएल विमान कारखान्याचे खरे जनक असल्याने त्यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहावरून यशवंतराव चव्हाण हे केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले होते. त्या ऐतिहासिक घटनेचे वर्णन ‘सह्य़ाद्री हिमालयाच्या मदतीला धावला’ असे करण्यात येते. त्यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनीच यशवंतराव चव्हाण हे लोकसभेवर जाण्यासाठी नाशिक मतदार संघाची जागा रिक्त करून दिली होती.  दादासाहेबांनी केंद्र सरकारचा विमान कारखाना नाशिकमध्ये आणण्याची विनंती यशवंतरावांना केली होती. जिल्ह्य़ातील जनतेला रोजगाराची संधी त्यातून मिळेल. दादासाहेबांच्या आग्रहावरून ओझर येथे एचएएल कारखाना आला. त्यामुळे नाशिक विमानतळाला दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी कटारे यांनी केली. संयुक्त महाराष्ट्र लढय़ात अजोड योगदान देऊनही दादासाहेबांचे उचित स्मारक उभारण्यात आले नसून त्यांची उपेक्षाच सुरू आहे. याकडेही कटारे यांनी लक्ष वेधले.