दिवसभराच्या धकाधकीनंतर थकून भागून घरी परतताना रेल्वे स्थानकाबाहेरून निघालेली ‘बेस्ट’ची बस रस्त्यातच बंद पडते.. वाहक प्रवाशांना खाली उतरवतो.. प्रवासीही वैतागत खाली उतरतात आणि मागच्या बसची वाट पाहत किंवा रिक्षा करून आपापले मुक्काम गाठतात.. मुंबईकरांच्या वाटय़ाला हा अनुभव महिन्यातून किमान अडीच हजार वेळा येतो. कारण ‘बेस्ट’च्या बसेस सरासरी अडीच हजार वेळा रस्त्यातच बंद पडतात. मात्र या ‘ब्रेकडाऊन’चा मोठा फटका सध्या बेस्ट प्रशासनाला बसत आहे. त्यामुळे आधीच तोटय़ात असलेल्या बेस्ट उपक्रमाला या ‘ब्रेकडाऊन’च्या चिंतेने घेरले आहे.
चालती फिरती बस नादुरुस्त होत असल्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वारंवार घडले आहेत. या प्रकारांमागे अनेक कारणे आहेत. मात्र कारणे काहीही असली, तरी त्याचा मनस्ताप प्रवाशांना सोसावा लागतो. बस बंद झाल्यानंतर वाहक प्रवाशांना खाली उतरवतो आणि मग मागून येणाऱ्या एखाद्या बसमध्ये त्यांची व्यवस्था करून देतो. मात्र ही बस गर्दीने भरली असेल, तर आधीच्या बसमध्ये सुखासुखी बसलेल्या प्रवाशांना लटकत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. मग प्रवासी बऱ्याचदा रिक्षाचा पर्याय निवडतात. सतत ब्रेकडाऊन होत असल्याने अनेकदा प्रवासी बसच्या वाटय़ाला न जाता शेअर रिक्षाचा अवलंब करत असल्याने ‘बेस्ट’ची प्रवासीसंख्या घटली आहे, असे बेस्टमधील सूत्रेच स्पष्ट करतात.
ब्रेकडाऊनची कारणे
गाडी ब्रेकडाऊन होण्यामागे अनेक कारणे आहेत. प्रत्येक गाडी आगारातून तपासणी झाल्याशिवाय बाहेर पडत नाही. त्यामुळे अचानक तांत्रिक बिघाडामुळे गाडी ब्रेकडाऊन होण्याचा प्रकार फार घडत नाही. पण पावसाळ्यादरम्यान रस्त्यातील खड्डय़ांमुळे गाडीचे इंजिन खराब होणे, टायर फाटणे, या गोष्टी वारंवार घडतात. त्यामुळे गाडी ब्रेकडाऊन होते. तसेच अनेकदा गाडी जूनी असल्यास ब्रेकडाऊनची शक्यता जास्त असते.
ब्रेकडाऊन झाल्यानंतर..
गाडी ब्रेकडाऊन झाल्यानंतर चालकाला गाडी सोडून कुठेही जाता येत नाही. मात्र वाहक नियंत्रण कक्षाला दुरध्वनीद्वारे माहिती देतो. गाडी ज्या आगाराची असेल, त्या आगारात वाहकाला सर्वात आधी माहिती द्यावी लागते. त्यानंतर ती माहिती वडाळा येथील केंद्रीय नियंत्रण कक्षाला देण्यात येते. गाडी ज्या ठिकाणी बंद पडली असेल, तेथून जवळ असलेल्या आगारातून वाहन बिघाड दुरुस्ती गाडी घटनास्थळी पाठवली जाते. या गाडीत एक मेकॅनिक आणि चालक असे दोन लोक असतात. गाडीतील बिघाड लगेच दुरुस्त करण्यासारखा असल्यास मेकॅनिक तो ताबडतोब दुरुस्त करतो. अन्यथा गाडी उचलून जवळच्या आगारात नेली जाते.

वर्ष               ब्रेकडाऊन गाडय़ांची संख्या
एप्रिल २०१०-मार्च २०११      ४३, ६५९
एप्रिल २०११-मार्च २०१२         ४४, ४३१
एप्रिल २०१२-मार्च २०१३     ३३, ०२१
एप्रिल २०१३-ऑगस्ट २०१३ १२, ३३५