नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. फक्त बाहेरून देखणी असलेल्या आहेत. काही ठिकाणी दारे तुटली आहेत तर काही ठिकाणी नळ गायब आहेत. शहरातील शौचालयांची दररोज साफसफाई होत नसल्याने शौचालयांत दरुगधी येत असल्याने झोपडपट्टीतील रहिवाशी उघडय़ावर प्रातर्विधी करतात. काही शौचालयांमध्ये सफाई कामगाराला राहण्यासाठी दिलेल्या खोलीत भाडेकरू ठेवण्यात आले आहेत. तसेच त्या शौचालयामध्ये स्वच्छता कामगार नाही. त्या ठिकाणी गर्दुल्ले, जुगारी, मद्यपींनी शौचालयांचे टेरेस आपले अड्डे बनवले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरामध्ये ४१७ शौचालये बांधली आहेत, पंरतु त्यांची साफसफाई खासगी ठेकेदारांवर सोपवण्यात आली आहे. पालिका दरवर्षी शौचालयाच्या निर्मितीसाठी व देखभालीवर कोटय़वधी रुपये खर्च करते. मात्र ठेकेदारांचे शौचालयाच्या स्वच्छतकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून नवी मुंबई महानगरपालिकेने अनेक वेळा संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचा प्रथम क्रमांक पटकावला आहे. पंरतु शहरामधील शौचालयाची अवस्था अत्यंत वाईट असलेली दिसून येत आहे.
नवी मुंबईत एमआयडीसीच्या जागेवर ग्रामपंचायत काळामध्ये कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता अनधिकृतपणे झोपडपट्टी दादांनी बठय़ा चाळी बांधूनोोपडपट्टी वसवली. त्या वेळी ड्रेनेज लाइन न टाकताच गटारे बांधण्यात आली असून बैठी सार्वजनिकशौचालये बांधण्यात आली होती. नंतर ग्रामपंचायतीचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाल्यांनतर अनधिकृतपणे झोपडपट्टीचे जाळे वाढू लागल्यांनतर शौचालये कमी पडू लागली. म्हणून महानगरपालिकेने काही ठिकाणी बैठी शौचालये पाडून दुमजली सार्वजनिक शौचालये बांधली आहे. पंरतु सध्याच्या स्थितीमध्ये या दुमजली शौचालयांची दुरवस्था झाली असून नागरिकांची गैरसोय होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक शौचालये कमी पडत असून ती अजून नवीन बांधण्यात यावी यासाठी नेहमीच आवाज उठवतात. मात्र शौचालयाच्या झालेल्या दुरवस्थेसाठी आवाज उठवत नाहीत.
दिघा येथील विष्णुनगर नाका परिसरात असणाऱ्या शौचालयामध्ये पाण्याचे नळ लिकेज असून त्या ठिकाणी लाइटीची व्यवस्था नाही. तसेच मलनिस्सारण वाहिन्यांचे पाइप लिकेज असल्याने त्यांचे सांडपाणी रस्त्यावर येते. त्यामुळे नागरिकांना तिथून जाताना नाक मुठीत धरून जावे लागते. तर तुभ्रे येथील हनुमान नगर परिसरात असणाऱ्या शौचालयाच्या वरील बाजूस जुगारी पत्ते खेळत बसलेले असतात. तसेच मद्यपान करून शिवीगाळीदेखील चालू असते. रबाले येथील पंचशिल नगरमध्ये असणाऱ्या शौचालयामध्ये तुटलेल्या अवस्थेत दरवाजे व कडीकोयंडा असून शौचालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या काचेच्या खिडक्या तुटलेल्या आहेत. तर सारसोळे गावातील मच्छी मार्केट शेजारील असणाऱ्या शौचालयामध्ये पाण्याचे नळ लिकेज असून वेळेवर स्वच्छता करण्यात येत नसल्याने दरुगधी येते. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी नाक मुठीत धरून ये-जा करावी लागते.
अशीच परिस्थती नवी मुंबईतील बहुतेक शौचालयांची असून पाण्याचे नळ गळके असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे, तर शौचालयात रात्रीच्या वेळेला अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. शौचालयाची इमारत दुमजली असल्यामुळे गच्चीवर मद्यपी, जुगार खेळणाऱ्यांनी अड्डे बनवले आहेत. भिंतींवर अश्लील चित्रे काढून भिंती खराब केलेल्या आहे. खिडक्यांची तावदाने तुटलेल्या अवस्थेत असून दरवाज्यांचे कडीकोयंडेदेखील तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे उघडय़ावर शौचालयास बसणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून नवी मुंबईतील दिद्या येथील हिंदमाता शाळेजवळ, साठे नगर येथे चिंचेच्या झाडाखाली असणारे शौचालय, घणसोली सेक्टर १० येथील नाल्याजवळ, तुभ्रे स्टोअर्स येथील हनुमान टेकडीजवळील तसेच आदी ठिकाणी शौचालयाच्या बाजूलाच कचराकुंडी ठेवण्यात आल्या असून त्या ओसंडून वाहत असल्याने शौचालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विष्णू नगर येथील हनुमान चौक परिसरातील शौचालयातून सकाळच्या वेळी सांडपाणी समोरच्या रस्त्यावर जात असल्याने उग्र वासाने नागरिक हैराण झाले असून चिंचपाडा, यादव नगर, आनंद नगर, तुभ्रे, ऐरोली नाका, घणसोली, या परिसरातील शौचालये वेळेवर साफ करत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहेत. झोपडपट्टी भागात ड्रेनेज लाइन नसल्यामुळे घरांमध्ये शौचालये बांधणे नागरिकांसाठी अशक्य झाले आहे, असे पंढरीनाथ कांबळे म्हणाले. तर विष्णू नगर येथे असणाऱ्या शौचालयात रात्रीच्या वेळी अंधार असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी भीती वाटत असून शौचालयाच्या गच्चीवर काही टपोरी मुले मद्यपान करीत व जुगार खेळत असल्यामुळे शौचालयास येताना महिला घाबरतात, असे सचिन गायकवाड यांनी सांगितले. तसेच तुभ्रे येथे असणाऱ्या शौचालयाच्या बाहेर कचराकुंडय़ा ठेवण्यात येत असल्याने त्या ओसंडून वाहतात.
तसेच त्या ठिकाणी भटकी कुत्री कचरा अस्ताव्यस्त करीत असल्यामुळे शौचालयामध्ये येता-जाताना वाट काढावी लागते. शौचालयामध्ये जाण्यासाठी मासिक पास असून त्याचेदेखील पैसे दिले जातात. पण शौचालयामध्ये पाहिजे तशा पद्धतीने स्वच्छता करण्यात येत नाही, असे रामनाथ सिंग यांनी सांगितले. तर शौचालयामध्ये साफसफाई करण्यात येत नसल्यामुळे त्या ठिकाणी दरुगधी येत असते. म्हणून नाइलाजस्तव डोंगर भागात प्रातर्विधीसाठी जावे लागते, असे राजपाल यादव म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2015 रोजी प्रकाशित
नवी मुंबईत सार्वजनिक शौचालयांची दैना
नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. फक्त बाहेरून देखणी असलेल्या आहेत. काही ठिकाणी दारे तुटली आहेत तर काही ठिकाणी नळ गायब आहेत.
First published on: 04-04-2015 at 01:11 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public toilets in worst condition in navi mumbai