दुधाच्या दर्जाबाबत उलटसुलट चर्चा होत असली तरी जागतिक दूध दिनानिमित्त करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत मात्र ठाण्यात येणारे दूध शुद्ध असल्याचा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे. मात्र ठाणे जिल्ह्य़ात दूध पॅकिंगचा व्यवसाय करणाऱ्या १६ कंपन्यांमधून पथकाने दुधाचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल १४ दिवसांत येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सहआयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली.
ठाणे शहरातील विटावा आणि गायमुख जकात नाक्यांवर बुधवारी पहाटे अन्न व औषध प्रशासन विभागाने ‘दूध तपासणी’ मोहीम राबविली. यामध्ये राज्यातील इतर जिल्हे तसेच परराज्यांतून मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ात येणाऱ्या दूधगाडय़ांमधील दुधाची तपासणी करण्यात आली. जागतिक दूध दिनाच्या पाश्र्वभूमीवर राबविलेल्या या मोहिमेत सुमारे २३ वाहनांची तपासणी करून त्यांना सोडून देण्यात आले. १ जून जागतिक दूध दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने अन्न व औषध प्रशासन विभागाने जून महिन्यात दूध तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मुंबई तसेच ठाण्यामध्ये इतर जिल्ह्य़ांतून आणि परराज्यांतून दूध येते. या दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी पथकाने विटावा व गायमुख जकात नाक्याजवळ विशेष मोहीम राबविली. मंगळवारी रात्री १० ते बुधवारी पहाटे ६ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती. यामध्ये दुधाची वाहतूक करणाऱ्या २३ वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये वाहनातील दुधाची गुणवत्ता चांगली असल्याचे आढळून आले आहे.