scorecardresearch

रेल्वे खात्याकडून नियमांचे उल्लंघन

सामान्य श्रेणीचे तिकीट काढून शयनयान डब्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना दंड करण्यात रेल्वे खाते आघाडीवर असते.

रेल्वे खात्याकडून नियमांचे उल्लंघन

सामान्य श्रेणीचे तिकीट काढून शयनयान डब्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना दंड करण्यात रेल्वे खाते आघाडीवर असते. मात्र, रेल्वे खात्याकडूनच ‘पास एकाच्या नावावर आणि प्रवास दुसऱ्याचाच’ असा प्रकार घडला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करण्याच्या नावाखाली प्रवाशांकडे बोट दाखवणाऱ्या रेल्वे खात्याकडेच आता प्रवाशांची बोटे उचलल्या गेली आहेत. शिवाय रेल्वेच्या संघात अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्याचा समावेश  करण्याचा धक्कादायक प्रकारही उघडीस आला आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचा फूटबॉल संघ डेहराडून येथे आयोजित अखिल भारतीय जिप्सी गोल्ड फूटबॉल स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता. त्यासाठी नागपूरातून १७ जणांचा संघ पाठविण्यात आला. त्यासाठी ५ ते १४ फेब्रुवारी या दहा दिवसांच्या विशेष रजा मंजूर करण्यात आल्या. स्पर्धा खेळण्यासाठी अब्दुल खालिक, कमलजित शाहू, अरुण धुरिया, नितीन कुट्टलवार, अमित चौरासिया, अयाज अहमद, अमित अ‍ॅन्थोनी, मो. रिजवान, अफिक फराज अंसारी, तुशान जगदीश हरडे, सी. साईकुमार, मो. अजाज, रितेश इनुमुला, साजिद अनवर, शक्तीसिंग ठाकूर, ओवाईस खान, विश्वजित डे (संघ प्रभारी) यांची विशेष रजा दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे कार्मिक अधिकारी आणि क्रीडा अधिकारी आर. गणेश यांनी मंजूर केली. रेल्वे प्रशासनातील गलथानपणाचा कळस म्हणजे सी. साईकुमार हा अर्बन बँकेत चपराशी असल्याचे यादीत नमूद असतानाही रेल्वे अधिकारी आर. गणेश यांनी त्याचीही विशेष रजा मंजूर केली. त्यातही संघाचे प्रभारी विश्वजित डे यांच्या नावाने रेल्वेचा समूह पास न करता खेळाडू अमित अ‍ॅन्थोनी यांच्या नावाने रेल्वे पास तयार करण्यात आला. विशेष म्हणजे अ‍ॅन्थोनी संघासोबत न जाता एक दिवस आधीच कुटुंबासोबत निघून केले. रितेश इनुमुला देखील एक दिवसआधीच डेहराडूनकडे रवाना झाले. उर्वरित १४ खेळाडूंचा संघ (ज्यात रेल्वे कर्मचारी नसलेल्या एका खेळाडूंचा समावेश होता) सहा फेब्रुवारीला गोंडवाना एक्स्प्रेसने दुपारी एक वाजता डेहराडूनला निघाला.
समूहपास ज्याच्या नावाने असतो तो प्रवास करताना हजर असणे आवश्यक आहे. रेल्वेचा प्रवास पास दुसऱ्याला हस्तांतरित करणे गुन्हा आहे, असे असताना रेल्वे पासधारक व्यक्ती विशेष रजा घेऊन घरीच राहिली आणि संघाने अवैधरित डेहराडूनपर्यंतचा प्रवास केला.
यासंदर्भात बोलताना दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ क्रीडा अधिकारी व्ही. धुव्हारे म्हणाले, प्रत्येक कर्मचाऱ्याकडे रेल्वे पास असते. कधी रेल्वे आरक्षणाच्या अडचणी येतात. त्यामुळे एखादा खेळाडू मागे-पुढे जाऊ शकतो. मात्र, त्यांनी रेल्वे संघात अर्बन बँकेच्या चपऱ्याशाचा समावेश कसा, याबद्दल बोलण्याचे टाळले. खेळाडूंच्या सुविधेनुसार विशेष रजा मंजूर केली होती. सराव करण्यासाठी, स्पर्धा खेळण्यासाठी विशेष रजा देण्यात येते. खेळाच्या सरावासाठी योग्य वेळ बघून रजा मंजूर केली जाते, असे क्रीडा अधिकारी आर. गणेश म्हणाले.

स्पर्धेत झोनचा संघ सहभागी होत असल्यास, त्या संघात झोनच्या कोणत्याही विभागातील खेळाडू समाविष्ट केला जातो. परंतु स्पर्धेत नागपूर विभाग सहभागी होत असेल तर त्यात झोनमधील इतर विभागाचे खेळाडू राहणार नाहीत. एखाद्या विभागात स्पोर्ट्स कोटय़ातील खेळाडूंची संख्या कमी असेल. संघ पूर्ण होत नसेल तर रेल्वेच्या इतर कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश करता येतो. परंतु रेल्वेबाहेरील कुणालाही संघात समाविष्ट करता येत नाही.
-हिमांशू, क्रीडा अधिकारी,
मुख्यालय, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे, बिलासपूर.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-02-2015 at 01:58 IST

संबंधित बातम्या