टंचाईची चिंता अजूनही कायम
गेल्या आठवडाभरात दमदार पाऊस झाला असला तरी नागपूर विभागातील जलसाठे अजूनही तहानलेले आहेत. विभागातील दहा प्रकल्प कोरडेच असून जवळपास ३२ प्रकल्पांचा साठा दहा टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे. प्रकल्पांची पातळी वाढण्यासाठी सर्वदूर मोठय़ा पावसाची प्रतीक्षा असून पाणी टंचाईची चिंता अजूनही कायम आहे.
 विभागातील १८ मोठय़ा प्रकल्पांपैकी ४ प्रकल्प आणि मध्यम ४० पैकी ६ प्रकल्प अजूनही कोरडे आहेत. यामध्ये भंडारा जिल्ह्य़ातील बावनथडी, गडचिरोली जिल्ह्य़ातील दिना, गोंदिया जिल्ह्य़ातील कालीसरार, नागपूर जिल्ह्य़ातील नांद वणा या मोठय़ा प्रकल्पांचा समावेश आहे. इटियाडोह, सिरपूर, पुजारी टोला, बोर या मोठय़ा प्रकल्पांतील साठा दहा टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. विभागातील मोठय़ा शहरांना व ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणारे प्रकल्प अजूनही कोरडे असल्याने टंचाईची चिंता कायम आहे.
विभागातील सायकी, बेटेकर बोथली, चुलबंद, रेंगेपार, संग्रामपूर, उमरझरी, कटंगी हे मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून ४ मोठय़ा व २८ मध्यम प्रकल्पांतील जलसाठा १० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मध्यम प्रकल्पांप्रमाणेच लघु प्रकल्पांच्या जलसाठय़ाची स्थितीही चिंताजनक आहे. विभागातील लघु  प्रकल्पात केवळ ११ टक्के साठा शिल्लक आहे.
गोंदिया जिल्ह्य़ात लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ३, भंडारा ७, चंद्रपूर १०, वर्धा ११, गडचिरोली १ व नागपूर जिल्ह्य़ात १९ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्य़ातील गोसीखुर्द  आणि नागपूर जिल्ह्य़ातील कामठी खैरी या दोन मोठय़ा प्रकल्पांमध्ये ६० टक्के  शिल्लक असला तरी इतरत्र मात्र कठीण स्थिती आहे.