सारासार विचार न करता राजन वेळूकर यांचे नाव कुलगुरूपदासाठी सुचविण्यात आल्याचे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनाविल्यानंतर आता वेळूकर या पदावर राहतात की नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतात हा मुंबई विद्यापीठात उत्कंठेचा विषय झाला आहे. तशात आता देशात प्रतिष्ठेची असलेली सायन्स काँग्रेस (विज्ञान परिषद) मुंबईत भरत असून अवघ्या तीन आठवडय़ांवर आली आहे. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने आयोजक या नात्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू हे त्यांचे स्वागत करणार आहेत. डागाळलेल्या प्रतिमेच्या वेळूकर यांना मोदींच्या खुर्चीला खुर्ची लावून बसण्याची संधी मिळणार की त्याआधीच वेळूकर पायउतार होणार, अशी चर्चा विद्यापीठात रंगली आहे.
३ जानेवारी २०१५ पासून मुंबईत विज्ञान परिषद भरणार आहे. ही परिषद विद्यापीठात होणार आहे. त्याची जय्यत तयारी सध्या विद्यापीठाच्या कलिना संकुलात सुरू आहे. या परिषदेला जगभरातील नऊ नोबेल पारितोषिक विजेते, सात हजार विद्यार्थी, चार हजार संशोधक हजेरी लावणार असून तब्बल ३२ व्याख्याने या परिषदेत होणार आहेत. ‘मानवाच्या विकासासाठी विज्ञान-तंत्रज्ञान’ असा विषय असलेल्या या परिषदेत विज्ञान व तंत्रज्ञानविषयक विचारांची व संशोधनाचे आदान-प्रदान अपेक्षित आहे. अशा या परिषदेत ज्यांच्या संशोधन कार्याविषयीच शंका घेतली जाते आहे अशा कुलगुरूंना स्वागताध्यक्ष म्हणून मंचावर बसण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न आहे.
काही अधिसभा सदस्यांनी तर या संबंधात राज्यपाल आणि उच्च शिक्षणमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. कुलगुरू म्हणून वेळूकर या परिषदेत पंतप्रधानांसह मान्यवरांचे स्वागत करणार आहेत. मुळात त्यांच्याकडे हे नैतिक अधिकार आहेत का, असा प्रश्न युवा सेनेचे विद्यापीठातील अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी केला. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे इतर अधिसभा सदस्यांसोबत याच प्रश्नावरून येत्या आठवडय़ात राज्यपाल व शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

रिक्त पदांचे काय?
३ ते ७ जानेवारी दरम्यान भरणारी ही विज्ञान परिषद सध्या आणखी एका कारणामुळे गाजत आहे. विज्ञान परिषद भरत असताना मुळात विद्यापीठाच्या विज्ञान विभागात शिक्षकांची मोठी वानवा असल्याचे चित्र समोर आले आहे. इतर विभागांतही हीच अवस्था असून विद्यापीठातील १०२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.