संत्रामार्केटजवळील ‘रामझुला’ या उड्डाण पुलाचा एक मार्ग फेब्रुवारीत वाहतुकीसाठी सुरू केला जाईल, अशी घोषणा गेल्या ऑक्टोबरमध्ये पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली होती, पण आता एप्रिल सुरू झाला तरी हा पूल अद्याप वाहतुकीसाठी सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
नागपुरातील एकात्मिक रस्ते विकास योजनेत २०००मध्ये हावडा ब्रिजच्या धर्तीवर केबल स्टेडचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, पण तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रशेखर यांची बदली झाल्यानंतर या प्रस्तावाकडे दुर्लक्ष झाले. रस्ते विकास महामंडळ आणि अ‍ॅफकॉन यांच्यात रेल्वेस्थानक, राममंदिर, संत्रा मार्केटजवळ केबल स्टेड रेल्वे उड्डाण पूल बांधण्याबाबत करार झाला. सुरुवातीला शासनाने याकडे लक्ष दिले. नंतरमात्र निधीअभावी काम रेंगाळले. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त लोकेशचंद्र यांनी केंद्राच्या जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेत कळमना व या पुलाचा समावेश केला. २००९ मध्ये उन्हाळ्यात पुलाचा एक मार्ग वाहतुकीसाठी सुरू होईल, अशी घोषणा तत्कालीन सार्वजनिक उपक्रम मंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. गेल्या ऑक्टोबर महिन्यात पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी एका पत्रकार परिषदेत पुलाचा एक मार्ग फेब्रुवारीमध्ये वाहतुकीसाठी सुरू केला जाईल, अशी घोषणा केली होती. यवतमाळमधून लोकसभेची जागा काँग्रेसतर्फे त्यांनी लढविली. त्यामुळे रामझुल्याला भेट दिली नाही. याचा परिणाम रामझुल्याचे काम अतिशय सावकाश सुरू आहे.
पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले गेले असल्यामुळे पुलाचे बजेट ७१ कोटींवर गेले आहे. दोन्ही बाजूला ७ केबल टाकण्यात आले आहेत. तसेच जयस्तंभाजवळ १४ केबल आणि मेयो हॉस्पिटलच्या बाजूला १३ केबलचे काम सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू असल्यामुळे एक मार्ग वाहतुकीसाठी सध्यातरी सुरू होणे शक्य नाही. या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.