मध्य भारतामध्ये झुलता पुल म्हणून नागपुरात रामझुला नागपुरात आकार घेत असताना गेल्या सात आठपासून वर्षांपासून प्रशासकीय आणि राजकीय नेत्यांच्या दिरंगाईमुळे अनेक समस्यांच्या दुष्टचक्रात हा पूल नागपूरकरांच्या वाहतूक समस्येचे ओझे पेलण्यापूर्वीच डोकेदुखी ठरला आहे. पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात पाच चे सहा वेळा पाहणी करून डिसेंबर २०१४ पर्यंत पुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन दिले असले तरी प्राप्त परिस्थितीत रामझुला प्रकल्प हा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.
पोद्दारेश्वर मंदिर ते जयस्तंभ चौक चौकादरम्यान वैशिष्यपूर्ण रामझुला उभारण्यात येत आहे. गंगनचुंबी पायलॉनवर दोन्ही बाजूंनी केबलद्वारे पुलाची बांधणी हे या प्रकल्पाचे वैशिष्टय़ आहे. अशा प्रकारचा हा मध्य भारतातील पहिलाच पूल आहेत. प्रत्येकी तीन पदराचे दोन पूल तयार करण्यात येणार असल्यामुळे त्यानुसार कामाची विभागणीही दोन टप्प्यात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात एक बाजू सुरू केल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेला पूल तोडून दुसऱ्या पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. सुमारे ६० कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च करण्यात येणार होते. त्यातील ४६ कोटी रुपये राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात येणार होते व उर्वरित  खर्च रेल्वेतर्फे करण्यात येणार होता मात्र, प्रत्यक्षात हा पूल आता ९० कोटीच्यावर जाईल, अशी सूत्रांनी दिली.  
 या रामझुलाच्या कामासाठी दरम्यानच्या काळात रेल्वेची परवानगी मिळविण्यात मोठा काळ गेला. २००६ मध्ये प्रत्यक्ष या कामाला प्रारंभ करण्यात आल्यानंतर ४२ महिन्यात दोन्ही पूल तयार करणे अपेक्षित होते आणि तसे आदेश शासनाने दिले होते. मात्र, वेळोवेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे आणि प्रशासकीय कामाच्या दिरंगाईमुळे काम लांबले. मान्यतेसाठी डिझाईनमध्ये करावा लागलेला बदल, वाढत जाणाऱ्या बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतीचे कारण पुढे करून मधल्या काळात दीड वर्ष काम बंद होते. सात वर्षांचा काळ लोटला असताना केवळ ४० ते ५० टक्के काम झाले आहे. तरीही पहिल्या टप्प्याचे ६२ टक्के काम झाले असल्याचा दावा रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आला. दसऱ्याच्या आधी पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी रामझुला पुलाची पाहणी करून काही तांत्रिक अडचणीमुळे काम रेंगाळले असल्याचे कबूल केले होते. केबल टाकण्याचे काम सुरू असून डिसेंबपर्यंत एका लाईनचे काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती दिसून येत नाही.  
या संदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता पी.एन. लाहोरे लोकसत्ताशी बोलताना म्हणाले, रामझुलाचे काम प्रगतीपथावर असून दिवसरात्र त्यासाठी काम सुरू आहे. सातव्या स्टॅंडच्या ट्रेसिंगचे काम सुरू असून लवकरच आठव्या स्टँडचे काम सुरू होईल. सोबतच केबल टाकण्याचे काम सुरू आहे. दोन टप्प्यात हे काम केले जात आहे. तीन मार्गी असलेल्या या पुलाचे काम सुरू असून पहिला मार्ग फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सार्वजानिक बांधकाम विभागाकडून दर आठवडय़ात पुलाच्या कामासंदर्भात आढावा घेतला जात असल्याचे लाहोरे यांनी सांगितले.