वर्धमान नगरातील लगून ब्लू पबमधील धाडीमुळे नागपुरातील उच्चभ्रू घरातील तरुण-तरुणी मोठय़ा संख्येने रेव्ह संस्कृतीच्या आहारी जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. घरून मिळणारा अमाप पैसा आणि मौजमस्तीची चटक लागलेल्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींना आता पब मालकांनी लक्ष्य केले आहे. निनावी जाहिरातबाजी करून अशा पबची निवड करायची आणि मद्यसेवन वा अंमली पदार्थाच्या सेवनाचे आमिष दाखवून या पिढीला व्यसनाधीन बनवायचे. या माध्यमातून बक्कळ पैसा खेचायचा अशी कार्यपद्धती पब मालकांनी अवलंबिली आहे. यामुळे पालकांना धास्ती बसली असून घराबाहेर पडल्यानंतर आपला पाल्य एखाद्या रेव्ह पार्टीत तर गेला नाही ना या चिंतेने पालक त्रस्त झाले आहेत.
रविवारची धाड टाकल्यानंतर ज्या अवस्थेत तरुण-तरुणींना पोलिसांनी बाहेर काढले त्यावेळी बघ्यांची तोबा गर्दी झाली होती. धाडीत पकडल्या गेल्यानंतर तरुणी तोड लपवित पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसत होत्या. काही तरुण बिनदिक्कतपणे कॅमेऱ्याला सामोरे जात चालत होते. वजनदार बापांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणालाही न जुमानता कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांपासून रेव्ह पार्टीचे ‘फॅड’ अचानक ऐरणीवर आले आहे. निर्जन स्थळी किंवा बडय़ा पबमध्ये अशा पाटर्य़ा आयोजित केल्या जात असून तरुणाईला व्यसनाधीन बनविले जात आहे. जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील तरुणाईला अशा जाळ्यात ओढण्यात येत असल्याने पालकांच्या जीवाला घोर लागला आहे.
रायगड जिल्ह्य़ातील खालापूर येथे २०११ साली जून महिन्यात अशा रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी जोरदार कारवाई करून ३०० मुला-मुलींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर मुंबईतील अत्यंत पॉश समजल्या जाणाऱ्या जुहू परिसरातील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा घातला होता. यात आयपीएलचे खेळाडूदेखील जाळ्यात अडकले होते. पुण्यातील वाघोली भागात पोलिसांनी सप्टेंबर २०१२ मध्ये एक रेव्ह पार्टी उधळून लावली होती.
याच वर्षी जुलै महिन्यात लोणावळ्यातील रेव्ह पार्टीवरील धाडीने पालकांमध्ये खळबळ उडवली होती. आता नागपूर शहरही रेव्ह पार्टीच्या जाळ्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्धमान नगरातील धाड पोलिसांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबविली. त्यामुळे पळून जाण्याच्या प्रयत्नातील तरुण-तरुणींचे प्रयत्न फसले. तोकडे कपडे घातलेल्या मुली मद्यसेवन करून कर्णकर्कश्श डीजेच्या गाण्यावर अश्लील पद्धतीने नृत्य करीत होत्या, असे पोलिसांनी म्हटले आहे.
जोडप्यासाठी ७०० रुपये तर एका व्यक्तीसाठी ५०० रुपये एवढे शुल्क पार्टीतील सहभागींसाठी आकारण्यात आले होते. ही रक्कम फार नसल्याने तरुण-तरुणी मोठय़ा संख्येने वर्धमान नगरातील लगून ब्लू पबमध्ये आल्या होत्या. एकूण १८ मुली आणि २७ मुले पार्टीत नाचताना सापडली. सर्वजण मद्यप्राशन करून झिंगत होते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2013 रोजी प्रकाशित
पालकांच्या जीवाला लागला घोर; नागपूरलाही रेव्ह संस्कृतीचा विळखा
वर्धमान नगरातील लगून ब्लू पबमधील धाडीमुळे नागपुरातील उच्चभ्रू घरातील तरुण-तरुणी मोठय़ा संख्येने रेव्ह संस्कृतीच्या आहारी जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. घरून मिळणारा अमाप पैसा आणि मौजमस्तीची
First published on: 27-08-2013 at 08:59 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rave parties in nagpur parents in tension