राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पुनर्मूल्यांकनाची वारंवार थट्टा होत असली तरी यात सुधारणा करायचीच नाही, अशी खूणगाठ विद्यापीठाने मनोमन बांधली असून त्यांचे दरदिवशी वेगवेगळे प्रताप समोर येत आहेत. येत्या २० दिवसांवर परीक्षा येऊन ठेपली असताना विद्यार्थिनींच्या हाती आता उत्तरपत्रिकांची झेरॉक्स देण्यात आली असल्याने विद्यार्थिनींनी पुनर्मूल्यांकन करावे की हिवाळी परीक्षा द्यावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
एम.एस्सी. पर्यावरणशास्त्र विषयातील एकाच महाविद्यालयाच्या सर्व मुलींना एकाच विषयात अनुत्तीर्ण करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. एम.एस्सी.(पर्यावरणशास्त्र) अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू आहे. तो अभ्यासक्रम केवळ तीन महाविद्यालयात शिकवला जातो. प्रत्येकी दहा विद्यार्थी अशी प्रवेश क्षमता या अभ्यासक्रमासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी एका महाविद्यालयातील सर्व दहाच्या दहा विद्यार्थ्यांना एकाच विषयात नापास झाल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यावर तब्बल दोन महिन्यांनी उत्तरपत्रिकांची झेरॉक्स कॉपी त्यांच्या हाती आली. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणपत्रिकेतील गुणदानाशी ते सहमत नसल्यास विद्यार्थी पुनर्मूल्यांकन करू शकतात. तत्पूर्वी त्यांच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी देण्याची सुविधा विद्यापीठात आहे.
एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका प्राप्त झाली आहे. त्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज द्यायचा केव्हा आणि त्यांचे पुनर्मूल्यांकन होऊन यायचे केव्हा? लगेच पूनर्मूल्यांकनास सुरुवात झाली तरी याचा निकाल सत्र परीक्षेपूर्वी लागणार काय, असाही प्रश्न यानिमित्त भेडसावतो आहे. एम.एस्सी. तिसऱ्या सत्राची परीक्षा येत्या १९ नोव्हेंबरपासून सुरू होत असल्यामुळे याचा निकाल लवकरात लवकर लावावा, असे सांगण्यास या विद्यार्थिनी आल्याहोत्या. मात्र विद्यापीठ अधिकारी बैठकांमध्ये व्यस्त असल्याने या विद्यार्थिनींना माघारी परत जावे लागले. त्यातच संस्थाचालकांच्या आंदोलनामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्यास कोणाला वेळ मिळाला नाही. आम्हाला जाणीवपूर्वक अनुत्तीर्ण करण्यात आल्याची भावना या विद्यार्थिनींमध्ये आहे.
भोंगळ कारभाराचा कळस म्हणजे एम.एस्सी. पर्यावरणशास्त्र अभ्यासक्रमातील विद्यार्थिनीने ज्या विषयाच्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स मागितली होती. त्या विषयाची झेरॉक्स न देता दुसऱ्याच विषयाची झेरॉक्स देण्यात आल्याने ती विद्यार्थिनी बुचकळ्यात पडली. मिळालेल्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स परत करून तिला पाहिजे त्या विषयाच्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स मिळवण्यासाठी पाच दिवस विद्यापीठात हेलपाटे मारावे लागले.