वसमत येथे होणाऱ्या मराठवाडा साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शनिवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे हे भूषविणार आहेत. संमेलनाध्यक्ष फ. मुं. िशदे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष आ. दांडेगावकर यांनी दिली.
 यापूर्वी १९८१ला वसमतमध्ये १४वे साहित्य संमेलन घेण्यात आले होते. त्या संमेलनाचे उद्घाटक भगवंत देशमुख होते. तब्बल ३२ वर्षांनंतर वसमत येथे दुसऱ्यांदा ३५वे अधिवेशन घेण्यात येत आहे. शनिवारी सकाळी जागर ग्रंथिदडीने संमेलनाची सुरुवात होईल. त्यानंतर बाबा भांड यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल. नरहर कुरुंदकर व्यासपीठावर भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होणाऱ्या या संमेलनास केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री डॉ. के. एस. राव यांची उपस्थिती असेल. सागर या स्मरणिकाचे प्रकाशन या वेळी होणार असल्याचे दांडेगावकर यांनी सांगितले.
सलग दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनास रविवारी ना. धों.च्या उपस्थितीत फ. मुं. िशदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या संमेलनात खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांची प्रा. दत्ता भगत व प्रा. नागोराव कुंभार प्रकट मुलाखत घेतील. त्यानंतर बालसाहित्य जत्रामध्ये श्याम अग्रवाल, केशव भा. वसेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहतील. बोलींमुळे मराठी साहित्य समृद्ध झाले, या विषयावरील परिसंवादात डॉ. विठ्ठल जंबाले, आसाराम लोमटे, शिवाजी अंबुलगेकर, बालाजी इंगळे, डॉ. दीपक चिदरवार, डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी विचार व्यक्त करतील. तर अन्य एका परिसंवादामध्ये ‘आजची मनोरंजनाची माध्यमे समाजाची अभिरुची बिघडवीत आहेत’ यावर चर्चा होणार आहे. सायंकाळी ७ ते १० या दरम्यान भ. मा. परसवाळे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १० नोव्हेंबर रोजी सकाळी मराठवाडय़ातील आंदोलने आणि साहित्य या परिसंवादात अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली इतर मान्यवर सहभाग नोंदविणार आहेत. त्यानंतर बालकविसंमेलन, तर ‘आम्ही उजेडाच्या लेकी’ या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील असतील तर परिसंवादात तस्नीम पटेल, डॉ. गीता लाटकर, केवलाबाई निवृत्तिगोंडा राजुरी, गंगा जावकर, दीपाली मोतीयाळे सहभाग नोंदविणार आहेत. कथाकथन व संतसाहित्याचे सामाजिक दृष्टीने आकलन हा परिसंवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ ते ६ दरम्यान भारत सासणे यांच्या हस्ते कविवर्य फ. मुं. िशदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.