पनवेलमध्ये अ‍ॅसिडचा टॅंकर उलटला
मुंबई-पुणे महामार्गावर पनवेलजवळील कोनफाटा येथे सकाळी साडेसात वाजता पाताळगंगा येथील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमध्ये जाणारा रासायनिक टँकर उलटला. टँकरमधील अ‍ॅसिटीक अ‍ॅसिड हे रसायन काही प्रमाणात रस्त्यावर सांडल्याने आणि परिसरात दरुगधी पसरल्याने एकच खळबळ माजली. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. परंतु अ‍ॅसिडच्या दरुगधीमुळे येथून प्रवास करणाऱ्यांची चांगलीच मुस्कटदाबी झाली. महामार्गापासून जवळच राहणाऱ्यांचा श्वास गुदमरल्याने अनेकांनी सकाळीच घराबाहेर धाव घेतली. याचदरम्यान सिडकोचे आणि रिलायन्स कंपनीचे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. या पथकाने माती व पाण्याच्या साह्य़ाने रस्त्यावर पडलेल्या अ‍ॅसिडवर नियंत्रण मिळवले. हा टँक गुजरात येथून समीर ट्रान्सपोर्ट कंपनीच्या टँकरमधून पाताळगंगा रसायनी येथे जात होता. हा अपघात नेमका घडला कसा याची अधिक चौकशी नवीन पनवेलचे पोलीस करत होते. अपघातानंतर पाच तास तो उग्र दर्प वातावरणात असल्याने येथे अपघात झाल्याची आठवण या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना देत होता.

सागरी किनाऱ्यावरील जनतेला पोलिसांचा सतर्कतेचा इशारा
प्रतिनिधी,उरण
उरणचा सागरी किनारा हा नेहमीच संवेदनशील राहिला असून या किनाऱ्यावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच एखादी संशयास्पद गोष्ट नागरिकांच्या निदर्शनास आल्यास त्याची तातडीने पोलिसांना माहिती देऊन होणाऱ्या अनुचित घटना थांबविण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन मोरा सागरी पोलीस ठाण्यात नागरिकांची बैठक घेऊन करण्यात आले आहे.
मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. एस. पठाण यांनी मोरा सागरी हद्दीत मोडणाऱ्या घारापुरी, केगांव, हनुमान कोळीवाडा तसेच मोरा परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमुख पदाधिकारी, सागरी सुरक्षा दल व ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य यांची बैठक घेऊन किनाऱ्यावरील संशयित हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले. या वेळी मच्छीमारांनी समुद्रात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या अनोळखी बोटीची माहिती तातडीने द्यावी, तसेच बोटीसाठी वाजवीपेक्षा अधिक भाडे देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचीही माहिती देण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. उरण सागरी किनारा १९९३ पासूनच संवेदनशील म्हणून गणला गेला आहे. तर २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतरही उरणमध्ये पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केलेले होते. मुंबईसारख्या शहरालगत असलेल्या उरणमधील सागरी किनारपट्टीवरील हालचालीवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याने सतर्कता म्हणून उपाययोजना सुरू केली आहे.

डंपर चोरटय़ाला अटक
प्रतिनिधी,उरण
उरण तालुक्यातील जांभूळपाडा या गावा जवळ उभा केलेला डंम्पर चोरीला गेल्याची तक्रार उरण पोलीसात जानेवारी २०१४ ला म्हणजे दहा महिन्यापूर्वी केलेली होती.याचा तपास करीत असतांना उरण पोलीसांना जांभूळपाडा गावातीलच नीलेश पाटील याने या डंम्परचे सुट्टे भाग करून ते भंगारवाल्याच्या मदतीने विकल्याचे उघड झाले असून उरण पोलीसांनी भंगारवाल्यासह दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून पोलीसांनी दोन लाखाचा मालही हस्तगत केला आहे. महेश नारायण पाटील यांच्या मालकीचा डंपर जांभूळपाडा वाघधोंडी येथे उभा केला होता. हा डंपर अनेक दिवस उभा असल्याने त्याचा मालक फिरकत नसल्याची खात्री करून घेतल्यानंतर नीलेशने प्रथम या डंपरची नंबर प्लेट बदलली होती. त्यानंतर डंपरचे सुट्टे भाग करून मोहम्मद कलिन अब्दूल शकीर या भंगारवाल्याच्या मदतीने विक्री केली आहे.उरण पोलीसांनी केलेल्या तपासात हे आढळून आल्याने आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आल्याची माहीती उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बी.एम.आव्हाड यांनी दिली आहे.

उरण बाजारपेठेतील रस्त्यांना अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा
प्रतिनिधी, उरण
अरुंद रस्ते आणि वाढती वाहने यांमुळे उरण शहरात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे उरणमधील नागरिक तसेच बाजारपेठेत येणारे ग्राहक त्रस्त असताना उरण शहरातील रस्त्यांवर जागा मिळेल तिथे अनधिकृत फेरीवाल्यांनी आपल्या हातगाडय़ा लावल्याने वाहतुकीला तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी उरणमधील नागरिकांकडून केली जात आहे.
उरण शहरात सुटीच्या तसेच सणाच्या दिवशी प्रचंड गर्दी असते. शहरात येणाऱ्या चारचाकी तसेच दुचाकी वाहनांना पार्किंगची सोय नसल्याने अनेक वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. त्यामुळे वाहतुक कोंडी होते. त्याच्याच जोडीला आता शहरातील चौका चौकात व रस्त्याच्या कडेला हातगाडय़ा, भाजी-फळेविक्रेत्यांची दुकाने थाटली जात आहेत. त्यामुळे रस्ते सोडाच परंतु पदपथही व्यापले गेल्याने पदपथावरून प्रवास करणाऱ्यांना भर रस्त्यातून वाहने थांबवून जावे लागत आहे. अडीच ते तीन किलो मीटर अंतराच्या उरण शहरात शेकडोंच्या संख्येने फेरीवाल्यांच्या गाडय़ा जागेजागी लागू लागल्या आहेत. या अनधिकृत फेरीवाल्यांवर उरण नगरपालिकेची कारवाई होत नसल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचे मत उरणचे रहिवासी दिनेश घरत यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दीच्या वेळी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात उरण नगरपालिकेचे नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता नगरपालिकेने परवानगी दिलेला एकही अधिकृत फेरीवाला नाही. त्यामुळे लवकरच उरण शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर नगरपालिकेच्या वतीने कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.