उरण तालुक्यातील अलिबागला जोडणाऱ्या उरण ते करंजा रस्त्याचे ग्रामसडक योजनेतून ९० लाखांचे काम करण्यात आले होते. जून २०११ साली काम पूर्ण झाल्यानंतर आलेल्या पहिल्या पावसातच रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले. अनेक ठिकाणचा रस्ता वाहून गेला. त्यामुळे चार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी या मार्गावरील प्रवाशांना धुळीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीची अनेक वेळा मागणी करूनही रस्ता दुरुस्त होत नसल्याने अखेरीस करंजा परिसरातील नागरिक संघटनेने याविरोधात मंगळवारी करंजा परिसर बंदची हाक दिली आहे.
चाणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील १२ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या रस्त्याची दुरवस्था झाल्याने पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत दुरुस्ती करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वष्रे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची तरतूद निविदेत करण्यात आली होती. तसे न केल्यास कंत्राटदाराला दंड आकारण्याचीही अट होती. मात्र मागील चार वर्षांत कंत्राटदाराने रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही. रस्त्यातील खड्डय़ांमुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
मागील दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधी, तहसिलदार तसेच जिल्हा परिषदेच्या अभियंत्यासोबत बठकाही झाल्या. त्यानंतर हा रस्ता सिडकोकडे हस्तांतरित करावा तसेच एम.एम.आर.डी.ए.मार्फत रस्त्याचे काम पूर्ण होईल यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होणे शिल्लक आहे, अशी आश्वासने वारंवार दिली जात आहेत. मात्र आम्हाला आश्वासन नको कृती हवी अशी भूमिका घेत चाणजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच के.एल. कोळी यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. तर याच वेळी करंजा परिसर बंद ठेवण्याचा इशारा पारंपरिक मच्छीमारांचे नेते सीताराम नाखवा यांनी दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2014 रोजी प्रकाशित
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आज करंजा बंदची हाक
उरण तालुक्यातील अलिबागला जोडणाऱ्या उरण ते करंजा रस्त्याचे ग्रामसडक योजनेतून ९० लाखांचे काम करण्यात आले होते.
First published on: 28-01-2014 at 06:58 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Repairing of roads in karanja