भाषणातून पुरोगामित्वाचा झेंडा रोवता यावा, म्हणून फुले-शाहू-आंबेडकर यांची पदोपदी आठवण काढणाऱ्या नेत्यांनी त्यांचे साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काहीएक प्रयत्न केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरात शासकीय मुद्रणालयाच्या ग्रंथविक्री विभागातून महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहूमहाराज व सावित्रीबाई फुले यांच्यावरील साहित्य, तसेच त्यांची पुस्तके उपलब्ध नाहीत. हे साहित्य वाचणारा मोठा वाचकवर्ग असला, तरीदेखील या पुस्तकांचे पुनर्मुद्रण होत नसल्याने वाचकांची निराशा होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवग्रंथ, त्यांचे लेखन व भाषणे याचे २२ खंड आहेत. काही खंड उपलब्ध आहेत, तर काही उपलब्ध नाहीत. अशाच प्रकारे अनेक पुस्तके उपलब्ध नसल्याचे औरंगाबादमधील लेखनसामग्री व ग्रंथागार विभागातील कर्मचारी सांगतात. तसे वर्षभरापूर्वी सहायक संचालकांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणलेही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रकाशित केलेले ‘बहिष्कृत भारत’ व ‘मूकनायक’ हे अंक एकत्रित पाहायला मिळावेत, म्हणून त्याचा ग्रंथ राज्य सरकारने प्रकाशित केला. मात्र, ते गेल्या काही दिवसांपासून वारंवार मागणी करूनही मिळत नाही, अशी तक्रार अनेकांनी केली.
या अनुषंगाने सरकारने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष प्रा. अविनाश डोळस म्हणाले की, समितीचे सदस्य सचिव नव्हते. पुरेसा कर्मचारीवर्ग नव्हता. त्यामुळे काही दिवस पुनर्मुद्रणाचे काम रेंगाळले. वर्षभरापासून अशीच स्थिती आहे. मात्र, आता मुद्रणाचे आदेश दिले आहेत. पाच हजार प्रती लवकरच उपलब्ध होतील. शासकीय ग्रंथागार कार्यालयामार्फत केवळ चार ठिकाणी विक्री होते. मुंबई,  पुणे, औरंगाबाद, नागपूर या शहरांतच ही पुस्तके मिळतात. समितीने शासकीय ग्रंथालयातही ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रा. डोळस यांनी सांगितले. तथापि, आजघडीला ही पुस्तके उपलब्ध नाहीत.
पुस्तक संपल्यानंतर त्याची मागणी नोंदविली जाते. मात्र, पुनर्मुद्रण होण्यास वेळ लागतो. कधी कधी २-३ वर्षेही निघून जातात. येणाऱ्या माणसाला पुस्तक उपलब्ध नाही असेच सांगावे लागते, असे या विभागातील कर्मचारी के. आर. कुमावत यांनी सांगितले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहूमहाराज यांच्यावरील पुस्तकेही उपलब्ध नाहीत. या पुस्तकांना मोठी मागणी कायम आहे.
केवळ या पुस्तकांच्या बाबतीत अनास्था आहे असे नाही, तर मराठी विश्वकोषाच्या सीडीदेखील विक्रीस उपलब्ध आहेत, हे सांगितले जात नाही. विश्वकोषाच्या १ ते १७ खंडांच्या सीडी तीन भागांत उपलब्ध आहेत. सवलतीच्या दरात केवळ ७०० रुपयांना हे साहित्य मिळू शकते. गेल्या वर्षभरात प्रचार आणि प्रसार नीट न केल्याने केवळ ६ सीडी विकल्या गेल्याचे सांगण्यात आले.
कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘बोलक्या कन्या’ या ध्वनिफितीही उपलब्ध आहेत. मात्र, त्याही पडून आहेत. एकीकडे काही पुस्तके पडून आहेत, तर काही पुस्तके उपलब्धच नाहीत. नांदेड, वर्धा जिल्ह्य़ांचा अपवाद वगळला, तर अन्य जिल्ह्य़ांचे गॅझेटियरच उपलब्ध नाही. या अनुषंगाने प्रा. हृषीकेश कांबळे म्हणाले की, फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव वारंवार घ्यायचे, पण त्यांचे लिखाण उपलब्ध होऊ द्यायचे नाही. ही राज्यकर्त्यांची मानसिकता समाजाची पुनर्बाधणी होऊ नये, अशीच आहे. हे सगळे अक्षम्य आहे.