साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या या शहरातील अवघ्या अकरा जणांनी महानगरपालिकेच्या तीन झोनमधून निमंत्रित सदस्यपदासाठी अर्ज सादर केलेले आहेत. विकास कामात लोकांचे सहकार्य मिळावे, यासाठीच त्यांना सदस्य म्हणून घेतले जात असले तरी या अर्जांची अतिशय कमी संख्या बघता यानिमित्ताने प्रतिष्ठीतांची अनास्था समोर आली आहे.
महानगरपालिकेने शहरातील ३३ प्रभागांचे तीन स्वतंत्र झोन तयार केलेले आहेत. प्रत्येक झोनमध्ये बावीस नगरसेवकांचा समावेश असून तीन सभापतींची निवड करण्यात आलेली आहे. यात झोन क्रमांक एकचे सभापती म्हणून भाजपचे रवी गुरूनुले, झोन क्रमांक दोनमध्ये कॉंग्रेसच्या अनिता कथडे, तर तीनमध्ये कॉंग्रेसचे अनिल रामटेके सभापती आहेत. आता या झोनमध्ये प्रत्येकी तीन प्रतिष्ठीत नागरिक व समाजसेवकांना सदस्य म्हणून पाठवायचे आहेत. महापालिका आयुक्त प्रकाश बोखड यांनी त्यासाठी प्रतिष्ठितांकडून रितसर अर्ज मागविले आहेत, परंतु साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात अवघ्या दहा प्रतिष्ठीत व समाजसेवकांनी सदस्यपदासाठी अर्ज सादर केलेले आहेत. यात झोन क्रमांक एकमधून अॅड. विनायक बापट, उमाकांत धांडे, आरती नेरलवार, डॉ.मनोहर लेनगुरे, दिनकर शेंडे, सुरेश लोहे, संजय महाडोळे व देवराव घाटे अशा आठ जणांनी अर्ज सादर केले, तर झोन क्रमांक दोनमधून अॅड.दत्ता हजारे व अॅड. राजेश विराणी, तर झोन क्रमांक तीनमधून केवळ प्रकाश कौर, असा एक अर्ज आलेला आहे. साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात केवळ दहा जणांनी या सदस्यपदासाठी अर्ज सादर केल्याने प्रतिष्ठीतांची एकूणच अनास्था यानिमित्ताने समोर आलेली आहे.
प्रतिष्ठीतांचा विकास कामात सहभाग राहावा, यासाठी राज्य शासनाने प्रतिष्ठीतांचा या समितीत सहभाग करून घ्यावा, असे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसारच झोन समिती तयार करण्यात आलेली आहे, परंतु महापालिकेचे विकास कामांकडे झालेले दुर्लक्ष बघता आणि एकूणच शहराची वाईट अवस्था बघता केवळ दहा लोकांनी अर्ज सादर केलेले आहेत. कोणताही सदस्य घेतांना तो माजी नगरसेवक, राजकीय पक्षाचा पदाधिकारी किंवा सक्रीय राजकारणात नसावा, ही प्रमुख अट आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी राहिलेले व नगरसेवकपदाची निवडणूक लढविणारे उमाकांत धांडे, संजय महाडोळे यांचे सदस्यत्व आताच रद्द होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. उर्वरीत आठ अर्जाची छाननी केल्यानंतर झोन समिती कुणाला सदस्य म्हणून घ्यायचे, हे ठरवणार आहे. यासंदर्भात शहरातील प्रतिष्ठीतांची मते जाणून घेतली असता पालिकेच्या गढूळ राजकारणापासून दूर राहण्यासाठीच अर्ज सादर केले नसल्याची प्रतिक्रिया बहुतांश लोकांनी व्यक्त केली. सक्रीय राजकारणात समाजातील चांगले लोक यावेत, या दृष्टीकोनातून सुध्दा अस्थायी सदस्य घेण्यात यावे, अशी सूचना समोर आली आहे, परंतु प्रतिष्ठीतांची एकूणच अनास्था बघता सक्रीय राजकारणात येण्यास कुणीही तयार नाही, असे निदर्शनास आले आहे.
विशेष म्हणजे, ज्या ११ जणांनी अर्ज सादर केलेले आहेत त्यातील बहुतांश वकील असून एकाही सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश नाही. गरीब, दिनदुबळे तसेच या शहराच्या विकासासाठी झटणाऱ्या एकाही नावाचा या यादीत समावेश नाही. कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या चार प्रमुख पक्षांनी किमान शहरातील चार प्रतिष्ठीतांना या निमित्ताने एकत्र आणणे गरजेचे होते, परंतु समितीत येण्यास कुणीही इच्छूक नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांची अनास्था सुध्दा या निमित्ताने समोर आलेली आहे. तीन झोनमध्ये एकूण नऊ सदस्य घ्यायचे आहेत. त्यातही एकाच झोनमधून आठ व काही दोन झोनमधून दोन व एक अर्ज आले आहेत. यासंदर्भात आयुक्त प्रकाश बोखड यांच्याशी संपर्क साधला असता कडक नियमावलींमुळे अर्ज कमी आल्याची माहिती त्यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.