विविध खासगी, निमशासकीय संस्था व औद्योगिक क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना किमान तीन हजार रुपये निवृत्ती वेतन मिळावे, यासह अन्य मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ९ डिसेंबरला दिल्ली येथील संसद भवन परिसरात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कर्मचारी निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय समन्वय समितीतर्फे व सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित या आंदोलनात संपूर्ण देशातून किमान तीन हजार सेवानिवृत्त कामगार सहभागी होणार आहे.
यापूर्वीच्या केंद्र सरकारने १९९५ मध्ये कर्मचारी निवृत्ती वेतन योजना लागू केली. परंतु त्याची अंमलबाजवणी लोकसभा निवडणुकीच्या आधी करण्यात आली. या योजनेनुसार प्रत्येक सेवानिवृत्त कामगारांना एक हजार रुपये वेतन देण्यात येत
आहे.
सध्या महागाईच्या काळात हे एक हजार रुपये कमी आहे. त्यात वाढ करून ते तीन हजार रुपयापर्यंत करण्यात यावे, कामगारांच्या वेतनातून ८.३३ टक्के वेतन कपात होऊन ती रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा होते. तेवढीच रक्कम मालकाकडून जमा करावी, तसेच सरकारनेही प्रत्येक कामगाराच्या खात्यात ८.३३ टक्के रक्कम सहयोग राशी म्हणून जमा करावी व रकमेतून सेवानिवृत्ती वेतन योजनेचा लाभ द्यावा, सेवानिवृत्ती वेतन म्हणून दिली जाणारी रक्कम महागाई भत्ता जोडून द्यावी, ही सेवानिवृत्ती योजना लागू करण्यासाठी अर्थसंकल्पात एक निश्चित रक्कम जमा करावी, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रकाश येन्डे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला अभिनंदन पळसापुरे, प्रकाश पाठक, प्रभाकर खोंडे, श्याम देशमुख उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2014 रोजी प्रकाशित
सेवानिवृत्त कामगारांचे दिल्लीत धरणे
विविध खासगी, निमशासकीय संस्था व औद्योगिक क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना किमान तीन हजार रुपये निवृत्ती वेतन मिळावे,
First published on: 05-12-2014 at 02:45 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retired workers protest in delhi