पांढऱ्या पाश्र्वभूमीवर काळ्या रंगाच्या रेषा, रंग आणि छटाही पाहताक्षणीच दोन रंगामध्ये विरोधाभास कुणालाही जाणवणारा, पाढऱ्यावर काळ्याचा किंवा काळ्यावर पांढऱ्याचा ‘बिंदू’सुद्धा लक्षवेधी ठरतोच. कठोर आणि बेफिकिरी वृत्ती दाखविणारा रंग, लहानांपासून मोठय़ापर्यंत आकर्षित करणारा, आजूबाजूची निरागस सृष्टी अभिव्यक्त करण्यासाठी ठाम निर्णयाची भूमिका सांगणारा काळा रंग, अंधारापासन ते प्रकाश किरणापर्यंत मूलतत्व सांगणारा, एकमेकांपासून विभक्त न होणारा रंग, काळा पांढरा ते पांढरा काळा पर्यंतच्या छटा सांगणाऱ्या रंगातच कलाकृती करणाऱ्या चित्रकारांची संख्या कमीच. नागपुरातही अशीच ओळख असणाऱ्या चित्रकाराचे प्रदर्शन आणि तेही र्रिटॉस्पेक्टीव्ह. चित्रकार चंद्रकांत चन्न्ो यांनी ‘कृष्ण विवर’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. २००३ ते २०१३ या दहावर्षांच्या काळात सर्व रंगाच्या मिश्रणातून तयार झालेली काळी कुळकुळीत चित्रे या प्रदर्शनात आहेत.  
त्यांनी काळ्या रंगाला आपलेसे करीत केलेली रेखाटने (ट्रॉईंग्ज), चित्र या प्रदर्शनात पुन्हा प्रदर्शित केली. लहानपणी संस्कार देणाऱ्या चिमूरच्या गल्ल्याबोळ्यातील पतंग, कंचे, सोनंपाखरं, गुलेर, लक्षी-प्राणी तर कधी स्वत:चा चेहरा आकारलेली ही चित्रे आहेत. लहानपणी खोलवर रुजलेल्या या प्रतिमांची उजळणी असली तरी अभिव्यक्तीचा अनुभव नव्याने देणारी, भूतकाळाशी नाते सांगणारी, आत्मशोध घेणारी, निवेदनातून सरफेसशी केलेल्या संवादाची ही चित्रे आहेत. निरागसपणे, स्वच्छंदीपणाने घेतलेली अनुभव कलाकृतीचे आशय व विषय आहेत. काळ्या व पांढऱ्या रंगातच निर्मिती करणाऱ्या चित्तप्रसाद, सोमाथाच्या परंपरेशी नाते सागणारी ही ‘कृष्णविवर’ अभिव्यक्ती मालिका आहे.
चित्रकाराच्या घराच्या रंगयोजनेत लक्षवेधी ठरणारी ‘ब्लॅक-व्हाईट’ संगती आणि भिंतीवरचे राजकपूर-नर्गिसचे ‘बरसात’मधील पोस्टर खिळवून ठेवणारे आहे. ‘स्पेस’ ‘महात्मा’ चाईल्डहुड मेमरी’ ‘कुण्डली’ किंवा आजपर्यंत केलेली अनेक चित्र मालिका काळी पांढरीच आहेत. चित्रकार आणि काळ्या पांढऱ्या जमान्यातला छायाचित्रकार असल्याचा परिणाम म्हणून सेपिया टोन चित्रात आला आहे. क्वचित आलेल्या लाल, पिवळ्या छटा चित्राला वेगळा परिणाम देतात. काळ्या व पांढऱ्यातच एकजीव होणारी वैशिष्टय़पूर्ण चित्रसंगती आहे. चित्रकाराची तीच ओळख आहे. मागे वळून पाहताना ‘कृष्ण विवरांच्या स्पष्टीकरणाची गरज नाही. चित्रकाराने काळा रंग आपलासा केला आहे. ‘कृष्ण विवरा’ला काव्यात्म परिणाम आला आहे. प्रा. चन्न्ो यांच्या ‘मागे वळून पाहताना’च्या प्रदर्शनाच्या आयोजनाची ही एक बाजू असावी. काळ्या रंगाच्या मासवर कुठेही हलकासा ओरखडा आला तरी काळजावर चर्र होईल इतकी संवदेनशीलता चित्रकाराकडे आहे. म्हणूनच ते स्वत:ला व कला रसिकाला कृष्णविवरात नेऊ शकतात. प्रदर्शन पाहिल्याशिवाय हा अनुभव येणार नाही.