आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी रिक्षामीटर सक्तीच्या अंमलबजावणीसाठी सुरू केलेली धडक मोहीम थोडी शिथिल झाल्यानंतर आता पुन्हा मीटर डाऊन न करण्याची अरेरावी काही रिक्षाचालकांनी सुरू केली आहे. त्यासाठी आता चक्क ‘जाती’चा आधार घेतला जात आहे. तसेच मीटर डाऊन करून पश्चिमेहून पूर्वेला जाण्यासाठीही रिक्षाचालक टाळाटाळ करत आहेत.
आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनीही आपला स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक प्रवाशांसाठी जाहीर करून रिक्षात बसल्यानंतर रिक्षाचालकाने मीटर डाऊन करण्यास नकार दिला तर त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन करण्याचे आवाहन केले होते.
अनेक प्रवाशांनी त्याचा फायदा घेतला आणि घेत आहेत. मात्र आता काही रिक्षाचालकांनी आम्हाला पूर्वेला यायचे नाही, आम्ही पश्चिमेतच व्यवसाय करतो अशी कारणे सांगायला सुरुवात केली आहे. तसेच एखाद्या प्रवाशाने रिक्षाचालकाशी वाद घातला, मीटर डाऊन करण्याचा आग्रह धरला तर रिक्षाचालकाकडून त्या प्रवाशाला तुम्हाला न्यायालयात यावे लागेल, अशी भीतीही घातली जात आहे.
तसेच काही रिक्षाचालकांकडून ‘जाती’चे कारण पुढे केले जात आहे. आपण रिक्षासंघटनेचे नेते आहोत, तुम्ही मुद्दामहून ‘जय भीम’ असलेल्याच रिक्षाचालकांवर दबाव टाकता, मीटर डाऊन केले नाही तर आरटीओच्या डोळे साहेबांना फोन करीन अशी धमकी देता, असा कांगावा काही रिक्षाचालकांकडून सुरू करण्यात आला आहे.
रिक्षात बसणारा कोणीही प्रवासी त्या रिक्षाचालकाची जात काय आहे, ते पाहून किंवा त्याचा विचार करून रिक्षात कधीही बसत नाही, याबद्दल कोणाचेच दुमत होणार नाही. पण केवळ मीटर डाऊन करावे लागत असल्याने आणि पूर्वीप्रमाणे मनमानेल तसे भाडे उकळता येत नसल्याने काही रिक्षाचालकांनी आता अशी कारणे पुढे करायला सुरुवात केली आहे.
यामुळे सर्वसामान्य प्रवासी रिक्षाचालक जेवढे भाडे म्हणेल तेवढे देऊन किंवा नको ती कटकट म्हणून ती रिक्षा सोडून दुसऱ्या रिक्षाचा पर्याय स्वीकारत आहे.
मात्र यातून रिक्षाचालकांची मुजोरी आणि मीटर डाऊन न करण्याची प्रवृत्ती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरटीओ आणि वाहतूक पोलीस यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून मीटर डाऊन न करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात धडक कारवाई सुरू करावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2013 रोजी प्रकाशित
डोंबिवली पश्चिमेत रिक्षाचालकांची अरेरावी सुरूच
आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी रिक्षामीटर सक्तीच्या अंमलबजावणीसाठी सुरू केलेली धडक मोहीम थोडी शिथिल झाल्यानंतर आता पुन्हा मीटर डाऊन न करण्याची अरेरावी काही रिक्षाचालकांनी सुरू केली आहे.
First published on: 21-05-2013 at 12:32 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riksha drivers arrogance continued in dombivali west