शहरानजीक बेट भागात मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ४ ते ५ दरोडेखोरांनी तलवार, चाकू काठय़ांसह व पिस्तुलाचा धाक दाखवून एका कुटुंवाला मारहाण करीत सोन्या-चांदीचे दागिने व ५० हजारांची रोकड चोरून नेली. चोरटय़ांच्या मारहाणीत चौघे जखमी झाले आहेत.
आरडाओरडा झाल्याने नागरिकांनी एका दरोडेखोरास पकडून त्यास बेदम चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले. लहू पवार असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान जमावाला पांगविण्यासाठी चोरटय़ांनी पिस्तुलातून गोळीबारही केला.
बेट भागात रात्री परसराम रघुनाथ गिते यांच्या घरी हा दरोडा पडला. शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्या घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण करीत महिलांच्या अंगावरील मणीमंगळसूत्र व अन्य दागिने, रोख रक्कम व मोबाइल असा ४९ ह्जार ३०० रुपयांचा ऐवज लुटला. या प्रकारामुळे भयभीत झाल्याने आरडाओरडा झाली त्या वेळी नागरिक जमले. नागरिकांनी लहू पवार या दरोडेखोरास पकडले व बेदम मारहाण केली. त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले. या झटापटीत परसराम रघुनाथ गिते, वैभव परसराम गिते, योगेश गंगाधर गिते व विलास तुकाराम गोंदकर हे जखमी झाले आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता ठाकरे यांच्यासह निरीक्षक मधुकर औटे यांनी घटनास्थळी भेट दिली. येथे श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.