अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी येथील गावगुंडांकडून हुतात्म्यांच्या वारसदारांना त्रास होत असून याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांच्या वारसदारांनी केली आहे.
१९३० साली सोलापुरात मार्शल लॉ चळवळ झाली, त्या वेळी इंग्रज सरकारने मल्लप्पा धनशेट्टी यांच्यासह चार देशभक्तांना फासावर चढविले होते. हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांचे वारसदार तथा दिवंगत माजी आमदार शिवशंकरप्पा धनशेट्टी यांच्या कुटुंबीयांची अक्कलकोट तालुक्यातील मैंेदर्गी येथे शेतजमीन आहे. या शेतजमिनीत सिंचन व्यवस्था होण्यासाठी, पाण्यासाठी स्त्रोत म्हणून  लगतच्या मिरजगी येथे शेतजमीन रीसतर खरेदी करून त्याठिकाणी विहीर खोदण्याचे काम धनशेट्टी कुटुंबीयांनी हाती घेतले होते. परंतु तेथील भीमाशंकर निंबाळे, म्हाळप्पा िनबाळे, कल्लप्पा बनसोडे आदींनी बेकायदा जमाव करून धनशेट्टी कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत विहिरीचे काम बंद पाडले. यासंदर्भात शिवशंकरप्पा धनशेट्टी यांचे दत्तक पुत्र शिवकुमार धनशेट्टी यांनी अक्कलकोट पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे सून अन्नपूर्णाबाई धनशेट्टी व शिवकुमार धनशेट्टी यांनी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दाद मागतिली. या वेळी काँग्रेसचे नगरसेवक उदयशंकर चाकोते हे उपस्थित होते.