राज्याचे नवे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बळ) म्हणून एस.डब्ल्यू.एच. नकवी यांनी आलोक कुमार जोशी यांच्याकडून पदभार स्वीकारला.
वन विभागाच्या मुख्यालयी वन भवनात आयोजित समारंभात जोशी यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. १९७५ च्या भारतीय वनसेवेतील जोशी २२ व्या वर्षी वनसेवेत रुजू झाले होते. ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बळ) पद भूषविल्यानंतर सोमवारी ते सेवानिवृत्त झाले. समारंभाला प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) रामानूज चौधरी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक  ए.के. झा, गैरोला, श्रीभगवान, ए.के. मिश्रा, बी.एस. के. रेड्डी, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर व चौधरी यांनी जोशी यांच्याविषयी माहिती दिली. नकवी यांनी जोशींच्या कार्यकाळात झालेल्या प्रगतीची माहिती दिली. जोशी यांनी सत्काराला उत्तर देताना विविध कक्षांनी दिलेल्या योगदानाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप शेंडे यांनी केले.