एमआयडीसी परिसरातील सोनेगाव निपाणी जवळच्या संदीप मेटल क्राफ्ट कंपनीतील दोनशेच्यावर कामगार दोन वर्षांपासून थांबलेल्या वेतन वाढीसह विविध मांगण्यांसाठी मंगळवारी, १७ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहे. आज गुरुवारी कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन सुरू होते.
या कंपनीत स्थायी ७५, अस्थायी १२० व काही कंत्राटदारीवर काम करणारे कामगार आहेत. दोन वर्षांंपासून अपेक्षित वेतन वाढ झाली नाही. अस्थायी कामगारांना १० वर्षे झाली तरी स्थायी करण्यात आले नाही आदी प्रमुख मागण्यांसह कामगारांच्या प्रतिनिधींनी कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा केली यात कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यानंतर कामगार प्रतिनिधी, कंपनी व्यवस्थापन व कामगार आयुक्त लाकसवार यांच्यात बैठक झाली पण या चर्चेतही कामगारांना न्याय मिळाला नाही. यामुळे कामगार प्रतिनिधी समूहातर्फे मूळ मजुरीत वाढ करणे, वार्षिक वेतन वाढ करणे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, बोनस, अस्थायी कामगारांच्या सेवा कायम करणे, पगारी रजा देणे, कराराचा कालावधी लागू करण्यात यावा आदी मागण्या पूर्ण होईपर्यंत कामगारांनी काम बंद व धरणे आंदोलन करून संप पुकारला आहे. या कामगारांच्या मागण्यांवर कंपनी व्यवस्थापनाने लवकरात लवकर तोडगा काढून मागण्या मान्य कराव्या अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा विदर्भ प्रदेश औद्योगिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी दिला आहे.