मराठी रंगभूमीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानच्या सवाई एकांकिका स्पर्धेत काही वर्षांपूर्वी स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अनेक मंडळी आज नामवंत झाली आहेत. अभिनय, लेखन, दिग्दर्शन आदी क्षेत्रात या कलाकारांनी आपले ‘सवाई’पण सिद्ध केले आहे.  गेल्या २७ वर्षांमध्ये तेव्हा स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या या स्पर्धकांनी आजच्या घडीला प्रसिद्ध अभिनेते/अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक म्हणून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.
हे होते सवाई अभिनेते-अभिनेत्री
संजय नार्वेकर, स्पृहा जोशी, आनंद इंगळे, अविष्कार दारव्हेकर, शरद पोंक्षे, मोहित टाकळकर, माधवी जुवेकर, वीणा जामकर, मृण्मयी देशपांडे, गिरीश साळवी, ओम भुतकर, सोनिया मुळे-परचुरे, चैत्राली चिरमुले, सीामा देशमुख, नीलम शिर्के, मधुरा देव हे कधी ना कधी स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते आणि ते तेथे अभिनयासाठी ‘सवाई’ ठरले होते. आजचे आघाडीचे लेखक संजय पवार यांनी तर लेखनासाठी सलग तीन वेळा ‘सवाई’चा मान मिळवून हॅटट्रीक केली आहे.
रमेश कोटस्थाने, प्रेमानंद गज्वी, संदेश कुलकर्णी, आनंद म्हसवेकर, शिरीष लाटकर, इरावती कर्णिक, योगेश सोमण आदीं सवाई लेखक ठरले होते तर तुषार दळवी, हर्ष शिवशरण, चंद्रकांत कुलकर्णी, विजय पाटकर, देवेंद्र पेम, केदार शिंदे, दीपक राजाध्यक्ष, निशिकांत कामत आणि अन्य जण सवाई दिग्दर्शक ठरले होते.
चतुरंग प्रतिष्ठानच्या या सवाई स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या परीक्षकांमध्ये दारव्हेकर,  पणशीकर, भक्ती बर्वे यांच्यापासून ते प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी, विनय आपटे, सुनील बर्वे, मंगेश कदम आणि अन्य मंडळींचा समावेश आहे.
‘सवाई’चा टिळा
 ‘सवाई’चा टिळा लागल्याने आपल्यातील कलागुणांना मान्यता मिळते आणि पुढील प्रवेशाची द्वारे खुली होतात, हे सवाई स्पर्धेने दाखवून दिले आहे. स्पर्धेत ‘सवाई’ ठरलेल्या तेव्हाच्या स्पर्धकांचे सवाईपण हे तात्पुरते नव्हते हे त्या सगळ्यांनी आज सिद्ध केले आहे.
विद्याधर निमकर (चतुरंग प्रतिष्ठान)