शिव्या आणि नौटंकी करून तमाशा होतो, राजकारण नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्ही ग्रामीण भाग जाणतो. दुष्काळाची जाणीव आहे. आम्हाला कोणी दुष्काळ सांगू नये. दगडफेक करून प्रश्न सुटत नाही, अशी टीका राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.
सिल्लोड येथील स्थानिक नेते ठगनराव भागवत यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार व पिचड बोलत होते. दोन्ही नेत्यांनी टीका केली. मात्र, पिचड यांचा मनसेवर हल्ल्याचा नूर अधिक आक्रमक होता.
पिचड म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने मनावर घेतले तर मनसेच्या नेत्यांना राज्यात फिरता येणार नाही. आम्हाला दमदाटी करायची गरज नाही. किणी प्रकरणात तुमची काय अवस्था झाली होती ते आठवा, असा टोला त्यांनी लगावला. अजित पवार यांनी मात्र थेट नाव न घेता टीका केली. गेल्या दोन दिवसांपासून मनसेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक वाहनांना लक्ष्य केले आहे. या पाश्र्वभूमीवर ते म्हणाले की, दगडफेक करून प्रश्न सुटत नाहीत. आपण चांगले वागणे व बोलणे शिकायला हवे. दुष्काळ मानवनिर्मित नाही, तर निसर्गामुळे तो निर्माण झाला आहे. त्यामुळे दुष्काळाचे राजकारण करू नका. पवार यांनी शिवसेनेवरही टीका केली. शिवसेना दुतोंडी राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी वचनपूर्तीचे राजकारण करते, असे सांगत त्यांनी बाभळी बंधाऱ्याच्या भूमिकेचा न्यायालयात विजय झाल्याचेही सांगितले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी रेल्वे अर्थसकल्पावर नाराज असल्याचे केंद्र सरकारला कळविले असून केंद्रीय अर्थसंकल्पावर मात्र समाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे बैठकीत व्यस्त
बुधवारी मराठवाडय़ात मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी एस. टी. बसेसवर दगडफेक केली. काही ठिकाणी बसही जाळल्या. या पाश्र्वभूमीवर बुधवारी शहरात दाखल झालेल्या राज ठाकरे यांनी या घटनांबाबत काहीही भाष्य केले नाही. गुरुवारी दुपारी बाराच्या दरम्यान सुभेदारी विश्रामगृहावर मनसे कार्यकर्त्यांच्या बैठका त्यांनी घेतल्या. पत्रकारांशी ते अनौपचारिक बोलतील, असे पूर्वी ठरविण्यात आले होते. मात्र, त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला. या सर्व घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर ते जालना येथील जाहीर सभेतच बोलतील, असे संपर्कप्रमुख सतीश नारकर यांनी सांगितले.